सुपा । वार्ताहर । Supa

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या २४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नव्या कृषी कायद्यांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप सरकारला त्यावर यश मिळालेलं नाही.

दरम्यान, रविवारी सकाळी दिल्ली आंदोलनातील वेगवेगळ्या राज्यातील सहा शेतकऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणमध्ये भेट घेतली.

या भेटीत अण्णा हजारे यांनी देखील दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे अशी मागणी त्या आंदोलक शेतकऱ्यांनी केली. यावेळी अण्णा हजारे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. "माझा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. यासाठी मी एक दिवसाचे उपोषण केले आहे. यासंदर्भात माझा केंद्र सरकार बरोबर पञव्यावहार चालू आहे. शासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मी माझे शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी करणार आहे, असे केंद्र सरकारला लेखी कळलले आहे. त्यासाठी मी शासनाला मैदानाची देखील मागणी केली आहे. शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यावर मी वेळ व ठिकाण जाहिर करून आंदोलन करेल," असे अण्णा हजारे यांनी दिल्लीहून आलेल्या शेतकऱ्यांपुढे आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, दिल्ली आंदोलनातील सहा शेतकरी रविवारी सकाळी राळेगण येथे दाखल झाले. यामध्ये हरियाणा, कर्नाटक, बिहार येथील काही शेतकरी असल्याचे समजते आहे.