
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी किसान रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
शनिवारी खा.डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतांना जिल्ह्याच्या विकासासाठी काही करु न शकलेले आता सत्ता गेल्यावर विकासाच्या नावाने बोंबा मारत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करीमुळे होणारी गुन्हेगारी मोडित काढली.
वाळू तस्करी, हप्तेखारी, अवैध धंदे बंद झाल्यानेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. विरोधकांकडे कोणतेही विकासाचे व्हिजन नाही, वैचारिक दूरदृष्टी नाही. विखे घराण्यावर ज्यांची बोलण्याची पात्रता नाही ते उठसूट आरोप करीत आहेत. सत्ता असतांना काहीही करु न शकलेले आता विकासाच्या गोष्टी बोलू लागले असल्याची टीका विखे यांनी नाव न घेता विरोधकांवर केली.
अनुदानासाठी अट शिथील करणार
राज्य सरकारने कांदा प्रश्नी शेतकर्यांना प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या अनुदानासाठी सात-बारा उतार्यावर ऑनलाईन कांदा पिकाची ई-पिक नोंदीची अट शिथील करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारशी चर्चा करणार असून नगर बाजार समितीत लासलगावप्रमाणे भाव मिळावा, यासाठी प्रयत्न आहे. दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये व्यापार्यांवर हल्ला झाला. त्या हल्ल्यातील आरोपींना जेरबंद केले आहे. परंतु, येत्या 10 दिवसांत जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी कडक पाऊले उचलण्यात येणार असून राज्यातील बाजार समितीमध्ये स्व. विखे पाटील यांच्या नावाने योजना आणून शेतकर्यांना संरक्षण दिले जाणार असल्याचे खा. डॉ. विखे यांनी यावेळी सांगितले.