
पारनेर | तालुका प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील खडकवाडी, पळशी, वनकुटे येथे शुक्रवारी अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यामध्ये कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा व झेंडू हे पीक काढणीला आलेले असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल विभागाने त्वरित करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याअगोदर झालेल्या गारपिटीने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी सावरत होता त्यातच पुन्हा अवकाळी पावसाच्या गारपिटीने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आर्थिक संकटात आहे, अचानक आलेल्या वादळी वारा गारपिटीसह पावसाने शेतात असलेल्या पिकांची नुकसान केले.
यामध्ये विकास रोकडे, आनंदा खोडदे, शिवाजी तळेकर गुरुजी, भाऊसाहेब फटांगरे, अशोक फटांगरे, भाऊसाहेब शिंगोटे, प्रताप रोकडे, किरण रोकडे, अरविंद रोकडे, मारुती रोकडे, पंकज गागरे, सतीश फटांगरे, शिवाजी गागरे, बन्सी गागरे, गोविंद गागरे, सचिन फटांगरे, अंबादास नवले, धनंजय ढोकळे, गणेश शिंदे, नानासाहेब गागरे, गंगाराम मोढवे, नितीन जाधव, गुलाब केसकर, योगेश जाधव, संदीप शिंदे, विश्वनाथ शिंदे, राजेंद्र जाधव, अमोल जाधव, साहेबराव गाजरे,सतीश फटांगरे, शिवाजी गागरे, बन्सी गागरे, गोविंद गागरे, सचिन फटांगरे, इ. शेतकऱ्यांसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
खडकवाडी, पळशी येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहेत. अद्याप पूर्वीचे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, तोच पुन्हा एकदा निसर्ग कोपला आहे. त्यात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे, तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
काशिनाथ दाते सर (सभापती, बांधकाम व कृषी समिती जि.प. अहमदनगर)
हाता तोंडाशी आलेले पीक होते. शेती उभारण्यात खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यात असे नुकसान झाले, माझे १० एकर कलिंगड, ३ एकर खरबूज, २ एकर झेंडू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
विकास रोकडे (शेतकरी, खडकवाडी)