पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील बहिरवाडी, हाकेवाडी, रुपनरवाडी व काळेवाडी येथील शेतकर्यांनी रात्री का होईना, परंतु पुरेशा दाबाने वीजपुरवठा

करण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या पाथर्डी कार्यालयास निवेदन दिले आहे. यात येत्या सोमवारपर्यंत पुरेशा दाबाने वीज मिळाली नाही, तर काळेवाडी येथील संगमेश्वराच्या मंदिरासमोरील झाडावर सामूहिक गळफास लावून घेण्याचा इशारा दिला आहे.

राज्य महावितरण विद्युत कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, बिबट्यांच्या दहशतीमुळे तालुक्यात दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे एकाचवेळी सर्वच विद्युत पंपसेट्स सुरू होत असल्याने पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. पाच मिनिटांत स्टार्टर पडून विद्युत पंपसेट बंद पडत असल्याने आवश्यक सिंचन होत नसल्यामुळे रब्बीची पीके जळू लागली आहेत.

अतिरिक्त पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके नष्ट झाल्याने अगोदरच शेतकरी हतबल झाला आहे. अशातच पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील पिकेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खरिपातील काही पिकांची काढणी झालेली असल्याने बिबट्यांचे हल्लेही होत नाहीत. त्यामुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्यास काही एक हरकत नाही.

तरी येत्या सोमवारपर्यंत रात्री का होईना परंतु पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुरू झाला नाही तर सामूहिक गळफास घेण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर मोहोज देवढे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश चितळकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास नरोटे, मोहोज देवढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी नरोटे, शहादेव नरोटे, जनार्धन रूपनर, भाऊराव रुपनर, विकास दिंडे आदी शेतकर्यांच्या सह्या आहेत.