शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्याच्या सरकारच्या घोषणा ठरल्या वल्गना

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्याच्या सरकारच्या घोषणा ठरल्या वल्गना

देवळाली प्रवरा | Deolali Pravara

दिवाळी-ओवाळी गेली, तरी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्याच्या सरकारच्या घोषणा फक्त वल्गनाच ठरल्या असून दिवाळीला पंधरा दिवस उलटून गेले, तरी एक छदामही हातात न पडल्याने बळीराजाला रब्बीची तयारी कशी करायची ? याची विवंचना भेडसावत असताना खरंच का हे माझं सरकार? असा मोठा प्रश्न पडला आहे.

ऑक्टोबर महिन्यात ढगफुटी सदृश धो-धो पाऊस पडला आणि या पावसात तालुक्यातील खरीप पिकांची पुरती वाट लागली. ऊरलं सुरलं सगळं पावसानं धूवून नेलं. पुन्हा एकदा बळीराजाला सरकारसमोर हात पसरण्याची वेळ आली. ‘कापसाच्या झाल्या वाती आणि सोयाबिनची झाली माती’ अशी वाईट अवस्था झाली. गेल्या दहा वर्षापासून ऊसाला एकच भाव मिळत असल्याने ऊस पिकापासून उदासिन झालेला शेतकरी भुसार पिकाकडे वळला, परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याची काही पाठ सोडली नाही.

ढगफुटीच्या पावसात हजारो एकर कपाशी व सोयाबीन पिकाची नासाडी झाली. तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेलं पिक हातातोंडाशी आल्याबरोबर निसर्गाने हिरावून नेलं. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटानी बळीराजा पिचून गेला आहे. याची मलमपट्टी करण्यासाठी मंत्र्यांचे पाहणी दौरे सुरु झाले. तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले.ऑनलाईन पिक पाहणीची अट शिथिल करण्यात आली. हेक्टरी दोन ऐवजी तिन हेक्टर ची नुकसान भरपाई देण्याची सरकारी घोषणा झाली.

या सर्व गोष्टींना आता जवळपास महिना होत आला. काही ठिकाणचे पंचनामे होऊन याद्या तहसिलमध्ये जाऊन पडल्या तरीदेखील अजून एक छदामही शेतकर्‍यांना का देण्यात आला नाही? हा देखील एक प्रश्नच आहे. या बाबत शासनाने तातडीने गंभीरपणे दखल घेऊन बळीराजाला नुकसान भरपाईची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

विमा कंपनीने केले हात वर

शेतकरी संकटात असताना विमा कंपनी वेगवेळ्या अटी व शर्ती शेतकर्‍यांना घालत आहे. विमा कंपनीचे अधिकारी शेतावर न येता एका ठिकाणी बसून शेतकर्‍यांना संबधीत कागदपत्र आणून देण्याचे फर्मान सोडत आहेत. पंचनाम्यासाठी हजार, दोन हजार रुपये घेत आहेत. नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार दाखल करण्याचे सांगण्यात येत आहे. संबधीत विमा कंपनीचे संकेतस्थळ सारखं जाम असल्याने लवकर फोन लागत नाही. फोन लागला तर पंधरा दिवसांनी पाहणीसाठी त्यांचा माणूस येत आहे. तो पर्यंत परिस्थिती बदललेली असते. आता काही शेतकर्‍यांनी जमिन नांगरल्यानंतर यांचे प्रतिनीधी येत आहेत. हे वराती मागूनचे घोडे नाही तर काय आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com