
पिंपरी निर्मळ | वार्ताहर
शेतकऱ्यांची बँक समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा बँकेकडून खरीपाच्या पीक कर्ज वाटपाची मुदत ३१ जुलै अखेर आहे. मात्र चालु वर्षी नवीन कर्ज मंजुरी तक्ते उशिरा झाले आहेत व मार्चनंतर बहुंताश सेवा सोसायटयांच्या निवडणुका झाल्या त्यामुळे खरीप कर्ज वाटपातुन अनेक शेतकरी वंचित राहीले आहेत. बँकेने खरीपाच्या पीक कर्ज वाटपास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.
जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी खरीप, रब्बी, गायीसाठी तसेच शेतीच्या यांत्रीकीकरणासाठी कर्ज वाटप करण्यात येते. चालू वर्षी मान्सूनच्या पावसाने दमदार आगमन केल्यामुळे सर्वत्र खरीपाच्या पीक पेऱ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. यासाठी शेतकऱ्यांना पिक कर्जाची गरज असते. जिल्हा बँकेकडुन ३१ जुलै अखेर खरीप पिक कर्जाचे वाटप होते. मात्र चालु वर्षी शासनाच्या निर्देशाप्रमाणे वाढीव मंजुऱ्यांचे कर्ज मंजुरी तक्ते नव्याने बनविन्यात आले.
मात्र यासाठी शासन व बँक पातळीवर उशिरा निर्णय झाला त्यामुळे नव्याने कर्ज मंजुरी तक्ते बनविण्यात व बँकेकडुन तपासुन घेण्यात बहुंताश संस्थाना जुन महिना उजाडला होता. त्यातच न्यायालयाने निर्देश दिल्याने मार्च ते जुन दरम्यान बहुंताश सोसायटयांच्या निवडणुक प्रक्रीया पार पडल्या. मतदार यादया तयार करणे ते प्रत्यक्ष निवडणुका या मध्ये सेवा संस्थाचे मनुष्यबळ गुंतल्यामुळेही कर्ज वाटपास उशिर झाला.
३१ मार्च अखेर किंवा ३० जुन अखेर आपापली कर्ज वेळेत परतफेड करणारे तसेच नव्याने सभासद होवुन कर्ज मागणी करणारे शेतकरी मोठया संख्येने खरीप पिक कर्जापासुन वंचित राहील्याचे चित्र आहे. त्यातच जिल्हा बँकेने खरीप पीक कर्ज वाटप बंद केल्यास अनेक शेतकरी पीक कर्ज वाटपापासून वंचित राहणार आहे. खरीपाच्या पिकांच्या मेहनतीसाठी त्यांच्यापुढे आर्थिक अडचण तयार होणार आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या हेतूने बँकेने खरीप पीक कर्ज वाटपास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.