शेतकर्‍यांचा उतारा कोरा न केल्यास दिवाळीच्या दिवशी चटणी-भाकर आंदोलन

शेतकरी संघटनेचा इशारा
शेतकर्‍यांचा उतारा कोरा न केल्यास दिवाळीच्या दिवशी चटणी-भाकर आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकर्‍यांवर असलेल्या या संकट काळामुळे त्यांची परिस्थिती आणखीच बिकट होत चालली आहे.

आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्याप्रमाणे शेतकर्‍यांचा सात बारा उतारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकर्‍यांना गेल्या 10 वर्षापासून सातत्याने 2012, 2015, 2016, 2019, 2020 मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आदी बाबींमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत करोना विषाणू 2020 मुळे पिकलेला शेतमालही कवडीमोल भावाने विकण्याची वेळी आली आहे.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतमालाला उत्पादन खर्चा इतकाही दर न मिळाल्याने तोट्यात विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आजही येत आहे. फडणवीस सरकारने अटी व शर्ती लादून केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकर्‍यांना झालेला नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून शेतकरी राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी, पतसंस्था, आदी बँकेचे कर्ज वरील बाबींमुळे थकलेले आहे.

त्यामुळे त्यांना नवीन पीक कर्ज मिळणे कठीण झालेले आहे. याचा परिणाम दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बँकांकडून शेतकर्यांना जप्तीच्या नोटिसा अथवा जप्तीची धमकी दिली जात आहे. व्यापारी बँकांकडून शेती कर्ज वाटतांना संबंधित कर्ज खातेदारांकडून कोरे चेक घेतले आहे.

परंतु सदर कर्जाचे हप्ते थकल्याने बँकाकडून चेक बँकेमध्ये टाकले जातात. खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने चेक वटत नाहीत. त्यामुळे बँका भारतीय दंड विधान कलम 420 अन्वये शेतकर्‍यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करीत आहे. याबाबींमुळे शेतकर्‍यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी सदर शेतकर्‍यांवर 420 अन्वये गुन्हे दाखल न करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत.

तसेच जिल्हा बँकेने चालू वर्षाकरिता राष्ट्रीयीकृत बँक थकबाकी शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्याचा एक चांगला निर्णय घेतला. परंतु राष्ट्रीयीकृत बँकाकडून सेवा सोसायटीसाठी थकबाकीचे दाखले न दिल्याने सदर कर्जापासूनही वंचित राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे.

तसेच जिल्हा बँकेतील थकबाकी शेतकर्‍यांना आजपर्यंत कुठल्याही कर्जमाफीचा लाभ न झालेल्या व सेवा सोसायटीचे कित्येक वर्षापासूनचे थकीत कर्ज राईट ऑफ न झाल्याने 7/12 उतार्‍यावर मालक सदरी सोसायटींच्या नोंदी लागले आहे. तरी सरकारने जाहिरनाम्याच्या प्रती क्षेत्रातील, रक्कमेची, तारखेची थकबाकी, चालू बाकी, अशी कुठलीही अटी शर्ती न लादता सरसकट संपूर्ण कर्जमाफी करुन स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किमान एकदातरी राज्यातील शेतकर्‍यांचा उतारा कोरा करावा. अन्यथा दिपावलीच्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी आपल्या दारात चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com