फळ विक्री करताना होणार्‍या दंडात्मक कारवाईमुळे शेतकरी हतबल

फळ विक्री करताना होणार्‍या दंडात्मक कारवाईमुळे शेतकरी हतबल

राहाता (प्रतिनिधी) - गावोगावी विक्री करुन दोन पैसे हातात येतील आणि कुटूंबाला आधार होईल या हेतूने तालुक्यातील जळगाव येथील तरुण शेतकरी राजेंद्र चौधरी सध्या खरबूज विक्री करत आहे. खरबूज नाशवंत फळ असल्याने तोडणीनंतर दोन दिवसात विक्री करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमुळे विक्री करताना होत असलेल्या दंडात्मक कारवाईमुळे ते पुरते हतबल झाले आहे. हिच अवस्था अनेक शेतकर्‍यांची सध्या दिसत आहे.

उच्चशिक्षित असूनही नोकरी न मिळाल्याने त्यांनी शेती करायचे ठरवले पहिल्यांदाच राजेंद्रने एक एकर टरबूज व एक एकर खरबूज केली. पीक जोमदार आले पण करोना महामारीच्या थैमानामुळे त्याला योग्य बाजारपेठ मिळेना. किमान झालेला खर्च व कर्जबाजारीपणाला काहीतरी आधार होईल अशी अपेक्षा त्यांना होती. डोळ्यादेखत शेतात फळे सडायला नको म्हणून कुटूंबातील सर्वच तोडणीचे काबाडकष्ट करतात. उच्चशिक्षित तरुण दररोज शेतातून खरबूज व टरबूज घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणे सात ते अकरा या वेळेत विक्रीसाठी घराबाहेर बाहेर पडत असतो. परंतु विक्री बाजूलाच राहते. त्या अगोदरच कधी पोलिसांचा, कधी नगरपालिकेचा तर कधी ग्रामपंचायत प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईचा फटका त्यांना बसत आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली शेकडो रुपयांची पावती फाडून त्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

बाजारात फळे आणावी तर पोलिसांचे दंडे व पावतीचा भुर्दंड! नाही आणावा तर शेतात नासाडी. यामुळे शेतकर्‍यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे. शहरात व गावोगावी अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतोय. तेथे मात्र दंडात्मक कारवाई करताना प्रशासनाचे दुर्लक्ष होते की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कवडीमोल किंमतीत आपला माल विकणार्‍या शेतकर्‍यांची अवस्था सुद्धा या लॉकडाऊनमध्ये बिकट झालेली आहे. त्यात शासनाचे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करताना शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेली दिसत आहे. दूध व शेती धंदा अडचणीत आला असून त्यात आणलेला माल नियमाने विकत असतानाही जर कारवाई केली जात असेल तर शेतकर्‍यांनी दाद मागायची कुणाकडे, असा संतप्त सवाल अनेक शेतकरी विचारत आहेत. मायबाप सरकारने शेतकर्‍यांचा वाली बनावे व कीपिंग क्वालिटी कमी असणार्‍या पिकांना, फळांना शासनाने स्वतःहून बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com