
कळस (वार्ताहर) / Kalas - पावसाची अनियमितता व तेल्या रोगाने डाळींबाचे संपूर्ण नुकसान होऊन सुध्दा घेतलेला विमा न आल्याने अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे शेतकरी बांधवांनी भर पावसात रस्त्यावर उतरून विमा कंपनी व प्रशासनाचा निषेध नोंदवला.
अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील शेतकरी जास्तीत जास्त डाळिंब पिकाची लागवड करतात. सततचे रोग व पावसाची अनियमितता यासतर्कतेमुळे शेतकरी बांधव आपल्या पिक कर्जातच डाळींबाचा विमा घेतात व काही शेतकरी वैयक्तिक विमा घेतात. गेल्या वर्षी तेल्या रोगाने आणि वादळी अतिवृष्टी मुळे डाळिंब अक्षरशः उखडुन पडले होते.सदर पिकांचा पंचनामा देखील झाला. पण प्रशासनाने फक्त कागद रंगवले आणि विमा कंपनीने शेतकर्यांच्या तोंडाला पान पुसली. बजाज कंपनी व एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हे डांळींबाचे विमे घेतले जातात. हजारो रूपयांचे विमा हप्ता भरून हाती काहीच मिळाले नाही. मग लोकप्रतिनिधी व प्रशासन विमा कंपनीला पाठीशी तर घालत नाही ना? असा घणाघात युवानेते अरूण वाकचौरे यांनी केला.
यावेळी संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे यांचे भाषण झाले. यावेळी अकोले-संगमनेर रस्त्यावर शेकडो वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी व पोलीस प्रशासन कळस येथे हजर झाले. शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत दोन दिवसात विमा अधिकारी व शेतकर्यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन कृषी अधिकार्यांनी दिले. व त्यांनतर आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. व लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
निवेदन देऊन देखील विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित न राहिलेने कंपनीचा निषेध नोंदविण्यात आला. दोन दिवसात विमा कंपनीचा अधिकारी यांनी शेतकर्यांची भेट घेऊन विमासंदर्भात पाऊल न उचलल्यास पुन्हा रास्ता रोको आणि तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन ग्रामपंचायत सदस्य केतन वाकचौरे यांनी दिले.
यावेळी संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, अरूण वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य केतन वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, कळस बु सोसायटी चे संचालक ज्ञानदेव वाकचौरे, जालींदर वाकचौरे, बाळासाहेब किसन वाकचौरे, शुभम वाकचौरे, दिलीप वाकचौरे, अमित वाकचौरे, श्रीकांत वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, रामकृष्ण वाकचौरे, आदिनाथ वाकचौरे, मच्छिंद्र भोर, भारत वाकचौरे, उल्हास कातोरे, राहुल वाकचौरे, प्रविण वाकचौरे, बाळासाहेब बिबवे आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.
पुढच्या दोन दिवसात विमा कंपनीच्या अधिकार्यांच्या सोबत कळस येथील सर्व डाळिंब पिक विमा धारक शेतकर्यांची चर्चा घडवुन योग्य तो मार्ग काढू.
-प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले