संगमनेर : दगडाला दूधाचा अभिषेक घालून राज्य सरकारचा निषेध

प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरु करा
संगमनेर :  दगडाला दूधाचा अभिषेक घालून राज्य सरकारचा निषेध

संगमनेर (प्रतिनिधी) - करोना काळातील परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांना कमी दर देवून शेतकर्‍यांची लूट केली आहे. या संघाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांच्यावतीने आज मंगळापूर येथे सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन केले.

लॉकडाऊनच्या काळाच मागणी घटल्याचा बाऊ करत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले. त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत चौकशी करा, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकर्‍यांची लूटमार करणार्‍या खासगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करावी, केलेली लूटमार वसूल करुन ती शेतकर्‍यांना परत करा, लॉकडाऊन पूर्वी मिळत असलेला प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरु करावा, दूध संघांच्या आगामी काळात दूध उत्पादकांची लूट करता येणार नाही यावर कायदा करावा, साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशिर दुहेरी संरक्षण लागू करा, अनिष्ट बॅ्रण्ड रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रॅण्ड धोरण स्वीकारा, दूध भेसळ बंद करा, टोंन्ड दुधावर बंदी आणा, भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन ग्राहकांना शुद्ध दुध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशिर हमी द्यावी, अशा विविध मागण्या यावेळी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री, तहसिलदार यांना पाठविण्यात आले आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी दूध उत्पादकांनी मंगळापूर दूध संकलन केंद्रासमोर रस्त्याच्या कडेला सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन केले. दूधाचे भाव पडले तरी सरकार हस्तक्षेप करत नाही, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केले गेले तर आगामी काळात दूध उत्पादक शेतकरी तीव्र आंदोलन करतील, शेतकर्‍यांच्या पोरांची डोके अजून शांत आहे, तेव्हा सरकारने विचार करावा, अन्यथा शेतकर्‍यांच्या पोरांची डोकी फिरली तर मंत्र्याची डोकी फोडल्याशिवाय या शेतकर्‍यांची पोरं स्वस्त बसणार नाही, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे दिपक वाळे यांनी दिला आहे.

यावेळी सोमनाथ भोकनळ, भानुदास गोरे, रमेश पवार, समिर वाळे, शिवाजी वाळे, गेणू पवार, राधू भोकनळ, नवनाथ भोकनळ, रावसाहेब वाळे, सोमेश्‍वर भोकनळ, भाऊसाहेब वाळे, योगेश भोकनळ, रामदास घुले, शुभम वाळे, भानु भोकनळ, मच्छिंद्र पवार, चंद्रभान भोकनळ, नामदेव पवार आदि शेतकरी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांचे निवेदन मंडलाधिकारी श्री. ससे यांनी स्विकारले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com