शेतकरी तरुणांनी तयार केले तुर शेंडे खुडणी यंत्र
सार्वमत

शेतकरी तरुणांनी तयार केले तुर शेंडे खुडणी यंत्र

अवघा 600 रुपये खर्च; एक व्यक्ती करु शकते दोन एकरात शेंडे खुडणी

Arvind Arkhade

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि मजुराला पर्याय म्हणून तालुक्यातील भेंडा येथील दोघाशेतकरी तरुणांनी अल्प खर्चात ‘तुर पिक शेंडे खुडणी यंत्र’ तयार केले आहे.

तुर पिकाचे शेंडे योग्यवेळी खुडल्यास, कापल्यास भरघोष प्रमाणात फांद्यांची वाढ होऊन उत्पन्नात मोठी वाढ होते. मजुरांची अडचण व कमी वेळेत कमी श्रमात आणि कमी खर्चात शेंडे कापणीसाठी भेंडा येथील राम कारभारी गरड व स्वराज भगवान गरड यांनी घरीच उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून हे यंत्र तयार केले.

राम गरड हा तरुण शेतकरी एम.एस्सी. असून औषधे तयार करणार्‍या पुणे येथील कंपनीत नोकरीस होता. तर स्वराज अभियांत्रिकी पदवी नंतर पुढिल अभ्यासक्रम नाशिक येथे करत होता. परंतु कोरोना मुळे दोघेही घरीच असल्याने काहीतरी वेगळे व चांगले शेतकरी हिताचे करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी ‘तुर शेंडे कापणी यंत्र’ तयार करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी लहान विद्युत मोटार, पाते, पीव्हीसीपाईप, वायर असे साहित्य खरेदी केले. घरच्याच औषध फवारणी पंपाचा वापर केला. यंत्र तयार करताना येणार्‍या अडचणी व सुधारणा करण्यास दोन दिवस लागले. एकुण 600 रुपयापर्यंत खर्च या यंत्रासाठी आला.

या यंत्राच्या साह्याने एका दिवसात एक व्यक्ती किमान दोन एकरातील तुरीचे शेंडे खुडणी करु शकतो. यंत्रा ऐवजी चार मजुरांकडुन याच दोन एकर शेंडे खुडणीसाठी किमान 1200 ते 1500 रुपये खर्च येतो. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ही या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहुन या युवकांच्या कार्याचे कौतुक केले.

Deshdoot
www.deshdoot.com