
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील वडगाव व चिंचपूर पांगुळ येथील सुमारे चाळीस शेतकर्यांच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील वीजपंपाची चोरी झाली आहे. चाळीस वीजपंपांची किंमत सोळा ते अठरा लाख रुपयापर्यंत आहे. वीजपंप चोरणार्या टोळीचा तपास पोलिसांना लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मंगळवारी चिंचपूर पांगुळ येथील तुकाराम नारायण बडे या शेतकर्याने पोलिसांत 10 एच.पी.चा वीजपंप चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. सोबतच सुमारे वीस ते पंचवीस शेतकरी देखील पोलीस ठाण्यात आले होते.आमच्या वडगाव व चिंचपूर पांगुळ दोन गावांतील सुमारे चाळीस वीजपंप चोरीला गेलेले आहेत.
परिसरातील चोरटे हे काम करीत असल्याचे शेतकर्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांना सांगितले. चोरीची तक्रार एका शेतकर्याने दिली असून पंचवीस ते तीस शेतकर्यांचे वीजपंप चोरीला गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये आशिष बडे, भगवान गरड, केशव केदार, घन:श्याम पांगरे, आजिनाथ पांगरे, रामनाथ गरड, सुभाष शेळके, हुसेन शेख, प्रभाकर रामराव बडे, किरण बडे, त्रिंबक गरड, आजिनाथ गरड यांच्यासह अनेक शेतकर्यांचा सामावेश आहे.
या सततच्या चोरी प्रकारांनी शेतकरी आता मेटाकुटीला आले आहेत. शेतकर्यांनी काही संशयितांची नावे पोलीस अधिकार्यांना सांगितली आहेत. चोरटे जवळचे असल्याने लवकरच जेरबंद करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.