मशागती पूर्ण करुन शेतकरी करताहेत पावसाची प्रतिक्षा

मान्सूनच्या उशिरा आगमनाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी चिंतेत
मशागती पूर्ण करुन शेतकरी करताहेत पावसाची प्रतिक्षा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच परिसरातील शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

हवामान खात्याने व विविध भाकिताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पावसाचे वेळेत आगमन होईल व सरासरी इतका पाऊस होईल, असे भाकीत केले होते. मात्र सद्यस्थितीत पावसाची चिन्हे दिसून येत नाही. मे महिन्यातच मान्सूनपूर्व सरींचे आगमन होऊन पाऊस पडण्यासाठी वातावरण निर्मिती खर्‍याअर्थाने होत असते. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून मे महिन्यात अतिउष्णतेचा सामना करावा लागला असताना जून महिन्यातही उन्हाची तीव्रता ‘जैसे थे’ असून अधून मधून ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा वाहत रात्री थंडगार हवा असे निसर्गाचे चित्र या भागात पाहण्यास मिळत आहे.

मागील दोन वर्षात बळीराजाला निसर्गाने चांगली साथ दिली, त्यात आजतागायत या भागात पाण्याची पातळी बर्‍यापैकी टिकून राहण्यास मदत झाली. मागील काळात पाऊस वेळेवर पडला तर त्यात अतिवृष्टीही झाली. त्यात पिके मातीमोल झाली तरीही बळीराजा डगमगला नाही. कारण खरीप हंगाम जरी वाया गेला तरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी पातळीत वाढ झाल्याने निश्चित फायदा होईल ही आशा बाळगून शेती व्यवसाय करण्यावर भर दिला आहे. परंतु यावर्षी जून महिन्यात पाऊस पडण्याची चिन्हे धूसर दिसू लागल्याने शेतकर्‍यांच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरले आहे.

गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता व दुबार पेरणी संकट या गोष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परंतु मागील दोन वर्षात चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु पावसाने बळीराजाच्या आनंदावर पूर्णपणे विरजण घातले असून विहिरी व बोअरवेलने तळ गाठले आहे. त्यात उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याने शेतीतील ऊस, फळबाग व पशुसंवर्धनाचा चारा पिकांची तहान अजून वाढली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे.

बियाण्याच्या दरात मोठी वाढ

सोयाबीन बियाण्याच्या तीस किलो च्या बॅगचे दर जवळपास चार हजार सातशे रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मागील वर्षांच्या तुलनेत एक हजार रुपये इतकी दरवाढ झाली आहे. त्यानंतर कपाशी 810 रुपयांमध्ये 450 ग्रॅम बियाणे मिळत आहे. त्यात देखील मागील वर्षाच्या तुलनेत पन्नास ते साठ रुपये वाढ झाली आहे. रानडुक्करामुळे शेतकरी मका पीक घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. रासायनिक खते, तणनाशके, औषधांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदामोठी वाढ दिसून येत असून सोयाबीन व कपाशी क्षेत्र वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com