सावकारांवर कारवाईस टाळाटाळ; शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील घटना
सावकारांवर कारवाईस टाळाटाळ; शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खासगी सावकारांवर प्रशासन कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशव्दारातील सुरक्षारक्षक पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडून आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केले. त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुनील शंकर नगरे (रा. म्हसणे, ता. पारनेर) असे या शेतकर्‍याचे नाव आहे.

दरम्यान आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगरेविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. सुनील नगरे हे गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. एक लिटरची बाटली भरून आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले. प्रवेशव्दारातील सुरक्षारक्षक पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून डिझेलची बाटली आणि काडेची पेटी काढून घेतली.

त्याच्याकडे आढळून आलेले निवेदन हे मुख्यमंत्र्यांच्या नावाचे आहे. उख्खलगाव (ता. श्रीगोंदे) येथील एक महिला आणि एक पुरूष तसेच रांजणगाव मशिद (ता. पारनेर) येथील एका अशा तीन सावकरांकडून शेतीच्या सुधारणेसाठी वेळोवेळी दोन लाख 50 हजार रुपये घेतले होते. अनामत म्हणून म्हसणे गावातील गट नंबर 335 मधील जमीन लिहून दिली होती. या तिन्ही सावकारांनी पैसे परत दिल्यास जमीन पुन्हा परत देण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. नोटरीसमोर हा करारनामा केला होता. त्यानंतर सावकरांनी सुमारे 10 लाख रुपये घेतले. परंतु, जमीन परत देण्यास नकार दिला.

या तिन्ही सावकारांवर कारवाई करण्यासाठी सहकार विभागाकडे तक्रार केली. त्यानंतरही सावकरांवर कारवाई झाली नाही. या सावकारांवर कारवाईसाठी आत्मदहन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या आत्मदहन आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतेही निवेदन दिलेले नव्हते. सर्व निवेदने मंत्रालयस्तरावर पाठविल्याचा दावा नागरे यांनी केलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com