पतसंस्थेच्या तगाद्याला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कान्हुर पठार येथील घटना, तिघांवर गुन्हे दाखल
पतसंस्थेच्या तगाद्याला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील कान्हूर पठार येथील अभिनव या पतसंस्थेच्या तगाद्याला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 5 ऑक्टोबरला उघडकीस आली असून याप्रकरणी उशिरा फिर्याद दाखल झाली आहे. दरम्यान आत्महत्या करणाराने सुसाईड नोट लिहिली असून यात तिघांची नावे आहेत. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास लोंढे, सुभाष लोंढे, कल्पना लोंढे (रा. कान्हूर पठार ता. पारनेर) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर भागचंद धोंडीभाऊ व्यवहारे (रा. कान्हूर पठार ता. पारनेर) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील अभिनव पतसंस्थेकडून सन 2007 मध्ये याच पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत असताना भागचंद व्यवहारे यांनी कर्ज घेतले होते. त्यांची शेती कर्जाला तारण होती.

आतापर्यंत वेळोवेळी कर्ज, व्याज यासाठी सातत्याने पतसंस्थेने तगादा लावला होता. या कर्जाच्या अनुषंगाने 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ठुबे मळा येथे अभिनव पतसंस्थेमार्फत कैलास लोंढे व मध्यस्थांनी व्यवहारे यांची भेट घेऊन नमूद कर्ज व इतर फायलींच्या अनुषंगाने 25 लाख रुपये भरण्यास सांगितले होते. यानंतर 5 रोजी सकाळी 6 वाजता नारायण टेकडी परिसरात त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने फाशी घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

मृत्यूपूर्वी भालचंद्र व्यवहारे यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी 2007 साली अभिनव पतसंस्थेकडून दीड लाख रुपये कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे. लोंढे बोगस फाईल दाखवून त्रास देत आहेत. त्यामुळे मागेसुद्धा विष घेण्याचा प्रयत्न केला होता. आता मुलांच्या नावे खातेवाटप केल्यानंतर लोंढे परिवाराने मला धमकी दिली. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कैलास लोंढे, सुभाष लोंढे यांचे कुटुंब जबाबदार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com