
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भाऊबंदांनी शेतातील रस्ता बंद केल्याने तसेच वारंवार त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून शेतकरी राजेंद्र दादाभाऊ लांडगे (वय 54 रा. घोसपुरी ता. नगर) यांनी आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील सहा जणांना अटक केली आहे.
राजेंद्र लांडगे यांना त्यांचे भाऊबंद गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांनी त्रास देत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा शेतातील रस्ता बंद केला होता. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे स्पिडपोस्टाने निवेदनही पाठवले होते. शुक्रवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास त्यांनी टोकाचा निर्णय घेत घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली असून याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा मुलगा अमोल राजेंद्र लांडगे (वय 27) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सुखदेव कान्हू लांडगे, कमल सुखदेव लांडगे, तात्याराम सुखदेव लांडगे, सुधीर राधूजी करंजुले, पोपट मच्छिंद्र लांडगे, दत्ता मच्छिंद्र लांडगे, हनुमंत सूर्यभान लांडगे, कौसाबाई मच्छिंद्र लांडगे, आशाबाई मच्छिंद्र लांडगे, दीपाली पोपट लांडगे, राजूबाई अरुण हंडोरे (सर्व रा. घोसपुरी ता. नगर) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सुखदेव, तात्याराम, सुधीर, पोपट, दत्ता, हनुमंत या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.