पावसाळा तोंडावर आल्याने शेतकर्‍यांना खरिपाचे वेध

रान तयार करण्याच्या कामाला वेग || 1 जूनपासून होणार कपाशीची लागवड
पावसाळा तोंडावर आल्याने शेतकर्‍यांना खरिपाचे वेध

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

ऊस, गहू व कांदा ही रब्बी हंगामातील पिके निघाल्यानंतर बळिराजाला खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने व यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकरी कापूस व सोयाबीनसाठी रान तयार करण्याच्या कामाला नेटाने लागले आहेत.

यंदा रब्बी हंगामातील कांदा पिकाला विचित्र हवामानाचा जबर फटका बसला. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. या पिकासाठी प्रचंड खर्च झाला असताना कांद्याचे बाजारभाव पडल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या सर्व संकटांना तोंड देत पुढील खरीप हंगामासाठी शेतकरी नेटाने तयारीला लागला आहे. गहू व कांदा निघालेल्या शेतात शेणखत टाकून या रानाची पुढील पिकासाठी नांगरणी सुरु आहे. नांगरणी झालेलं रान रोटा मारुन तयार करण्यात आले आहे. काहींनी कपाशी पिकासाठी सर्‍या पाडल्या आहेत तर काहींनी सोयाबीनसाठी रान तयार केले आहे. काही शेतकर्‍यांचे युध्दपातळीवर रान तयार करण्याचे काम सुरु आहे. कृषी विभागाने 1 जूनपासून कपाशीची लागवड करण्याचे मागील वर्षापासून सांगितले असल्याने आणखी आठ, दहा दिवस रान तयार करण्यास सवड मिळाली आहे.

44 अंश सेल्शियस तपमानामध्ये शेतकरी शेतात राबराब राबून खरिपाच्या तयारीला लागला आहे. यंदा ऊस लागवडीसाठी रान तयार करण्याऐवजी शेतकरी कपाशी व सोयाबीनसाठी रान तयार करत असल्याने कपाशी व सोयाबीनचे विक्रमी पीक होण्याची शक्यता आहे. त्यातच ऐनवेळी कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने व वेचणीचा भाव अव्वाच्या सव्वा असल्याने सोयाबीन पिकाकडे वाढता कल असल्याने सोयाबीनची लागवड जास्त होण्याची शक्यता आहे. कपाशीपेक्षा सोयाबीन लवकर निघते व पुढे कांदा वेळेवर होतो. म्हणून पहिली पसंती सोयाबीन दिसत आहे. एकंदरीत रणरणत्या उन्हात बळीराजा शेतात पुढील पिकाच्या आशेने खपत आहे.

देशाची लोकसंख्या 135 कोटीच्या वर गेली आहे. नगरपालिकेच्या क्षेत्रातील लोकसंख्या 50 हजाराच्या वर गेली आहे. तरुणांमध्ये रोज वाढती बेरोजगारी असल्याच्या बातम्या येत आहेत. इतकी बेरोगारी असतांना व इतकी लोकसंख्या वाढलेली असतांना शेतीसाठी मजूर का मिळत नाही? हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. बरे शेतीच्या कामासाठी रोजंदारी देखील कमी नाही. पुरुषांना सहाशे तर महिलांना तिनशे रुपये रोजंदारी पडते. अंगावर घेतलेले काम असेल तर याच्या दुप्पट रोजंदारी मिळते. तरी देखील शेतीसाठी मजूर मिळत नाही. ही फार मोठी अडचण शेतकर्‍यांची झाली आहे. व मजुरा अभावीच शेती अडचणीत सापडली आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण होऊन देखील मजुरांचा तुटवडा आज देखील आहेच. यामुळे भविष्यात शेती करणे अवघड होऊन बसले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com