वयाच्या नव्वदीतही शेती फुलवणारा हाडाचा शेतकरी

वयाच्या नव्वदीतही शेती फुलवणारा हाडाचा शेतकरी

अकोले (प्रतिनिधी) - सह्याद्रीच्या कुशीत दूर जंगलांच्या कडेला वसलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळने गावातील टेंभाडे वस्तीमध्ये आपल्या काळजाच्या तुकड्या प्रमाणे जपलेल्या शेतामध्ये मनसोक्त राबणारी जोडी जणू काही काळया आईचे पांगच फेडत आहेत. ज्या वयामध्ये लोक घराबाहेर पडत नाहीत त्या वयामध्ये अत्यंत कठोर मेहनत घेत आपल्या काळ्या आईची सेवा करणारे सच्चे आणि हाडाचे 90 वर्षीय शेतकरी नाना गोलवड व भिमाबाई जीवापाड मेहनत घेत आहेत. कष्ट आणि श्रम यालाच देव मानणारी ही जोडी आपल्या जीवापाड जपलेल्या शेतीला फुलवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे.

वयाच्या नव्वदीत जिवापाड जपलेल्या शेतीत मेहनत करणारी जोडी म्हणजे नाना रघुनाथ गोलवड व त्यांच्या पत्नी भीमाबाई नाना गोलवड होय.त्यांचे या वयातही आपल्या शेतीवर असलेले प्रेम आणि त्यातून आपल्या मेहनतीने व स्वकर्तुत्वाने फुलवला जाणार मळा सर्वांनाच आकर्षित करून जातो. शेती हेच त्यांचे जीवन चरितार्थाचे साधन आहे. शेतीशी एकनिष्ठ असणे म्हणजे काय हेच या जोडीने दाखवून दिले आहे. अत्यंत नम्र आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारे या जोडीने सर्वांची मने जिंकली आहेत. अनेकदा आपण बघतो की तरुणांमध्ये शेतीबद्दल आकर्षण उरलेले नाही. शेतामध्ये जाऊन आई-वडिलांना मदत करणारे युवक खूप कमी भेटतात.

गावागावात सार्वजनिक ओट्यांवर बसून मोबाईलवर मज्या मारणारे तरुण मात्र आपण सर्वत्र बघत असतो. या सर्व तरुणांना या शेतकरी जोडीने शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जणू काही चंग बांधला आहे. या जोडीने आपल्या अपार मेहनतीने इंच इंच भूमी पिकाखाली आणलेली आहे. अतिशय कार्यकुशलतेने व नियोजनाने ते आपली शेती फुलवत असतात. त्यांचा मळा बघण्यासारखा असतो उत्तम पद्धतीने नियोजन करताना सेंद्रिय शेती करण्यावर त्यांचा भर असतो. रासायनिक खते आणि औषधे यांचा ते बिलकुल वापर करत नाही. आपल्या शेतावर विविध प्रकारच्या पिकांची ते लागवड करतात.

त्यामध्ये भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, भुईमूग, लागवड गवार, भेंडी, काकडी, कारली, घोसाळी, दोडका, लाल भोपळा, दुधी भोपळा, अंबाडी, कारली, खुरसनी, खरबूज अशा नानाविध पिकांची ते लागवड करत असतात. आज नव्वदीत पोहोचलेल्या नाना घोलवड यांना शेतावर राबताना पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारला शिवाय राहणार नाही. कदाचित देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने नाना गोलवाड या आजोबा आणि आजी कडून शिकले पाहिजे. त्यांनी अत्यंत मेहनतीने उभी केलेले विविध पीक लागवड पद्धतीची शेती, शेतकरी वर्गाला नवी दिशा देणारी ठरली आहे. कष्टाने व श्रद्धेने आपण करत असलेले काम पुढे नेले पाहिजे हाच संदेश या जोडीकडून सर्वांसाठी आहे. त्यांचा मुलगा आनंदा व सून फसाभाई यांना ‘बायफ’ या संस्थेचे मार्गदर्शन लाभले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com