निम्मित करोनाचं, शोषण दूध उत्पादक शेतकर्‍यांच!

शेतकर्‍यांना किमान 30 रुपये हमी भावाची गरज
निम्मित करोनाचं, शोषण दूध उत्पादक शेतकर्‍यांच!

सुपा |वार्ताहर| Supa

दूध उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे. यामुळे त्यांच्या समस्यांचा एकत्रित विचार सरकारने केला पाहिजे. केवळ काही काळासाठी दूध उत्पादकांना 1 किंवा 2 रुपये भाव वाढ देऊन हा प्रश्न सुटणारा नाही, तर दूध व्यवसायासाठी शाश्वत धोरण ठरवले पाहिजे. तसेच दूध उत्पादक शेतकर्‍यांना किमान हमी भाव कसा मिळेल हे सरकारने पाहिले तरच दूध उत्पादक आणि व्यवसाय टिकणार आहे.

राज्यात खाजगी दूध संघ, सहकारी संघ, दूध संकलन केंद्र हे राजकीय प्रभावाखाली कार्यरत असल्यामुळे शासनाकडून दूध प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष आहे. राजकीय नेतृत्व दूध उत्पादकांच्या बाजूने राहण्याऐवजी संघ, डेअरी यांच्या बाजूने राहिले असल्याचे चित्र आहे.

शासनाने मध्यस्थ साखळीवर नियंत्रण आणले तर दूध आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, असे सर्वसामान्य दूध उत्पादकाला वाटते. राज्य सरकारने कायम स्वरूपाच्या ठोस उपाययोजना ठरवण्याची आवश्यकता आहे. सलग चार माहिने दूध धंदा तोट्यात करून शेतकरी आता हतबल झाला आहे. यावर पारनेर तालुक्यातील दूध उत्पादक व्यावसायीकांच्या व्यथा मांडल्या आहेत.

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आसताना राज्य सरकार दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. दूध उत्पादकांच्या संयमाचा अंत न पहाता सरकारने दुधाला 10 रुपये तातडीने अनुदान द्यावे.

- अनिल देठे पाटील (सूकाणू समिती सदस्य)

शेतकर्‍यांच्या दुधाला दर द्यायला सरकारला परवडत नाही. मात्र, अनेक दूध संघ, संस्था दुधावर प्रक्रिया करून उपपदार्थ तयार करतात. त्याचे दर मात्र कधीच कमी झालेले दिसत नाहीत. असे का होतेय? दूध जर कमी दराने मिळत असेल तर उपपदार्थांचे दर कमी व्हायला पाहिजेत. 4 महिन्यांत तसं झालेलं दिसत नाही.

- सुरेश बोरुडे, सरपंच नारायणगव्हाण

आमच्या परिसरात कष्टातून दूध व्यवसाय करून कुटुंब सावरण्याचा अनेक तरुणांचा प्रयत्न आहे. सध्याचा व्यवसाय मात्र पूर्णतः तोट्यात नेणारा आहे. एक संकरित गाय भाकड काळ धरून साधारण दर दिवसाला बारा ते पंधरा लिटर दूध देते. खुराक,चारा, रोजंदारी, दवाखान्याचा खर्च आणि इतर खर्च धरला तर आजच्या दूध दरानुसार शंभर ते दीडशे रुपये एका गाईमागे दर दिवसाला तोटा येत आहे.

- विक्रमसिंह कळमकर, उपसरपंच पाडळी रांजणगाव

सध्या दुधाला मिळणारा दर नफा देणारा नाही. 4 महिन्यांपासून दर वरचेवर कमी होत आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करत असून अनेकांचे घर-संसार त्यावर अवलंबून आहे. किती दिवस तोटा सहन करणार? सरकारने दर वाढवले पाहिजेत. अन्यथा व्यवसाय मोडकळीस येईल.

- दीपक खंदारे, दूध उत्पादक शेतकरी

शेतकर्‍यांनी आंदोलन केले की, सरकार तेवढ्यापुरते आश्वासन देऊन गप्प करतात. 4 महिन्यांपासून परिस्थिती सुधारली नाही. शेतकर्‍यांकडून अठरा ते वीस रुपयांनी घेतलेले दूध शहरी लोकांना चाळीस- पन्नास रुपये लिटरने विकले जातेय. शेतकर्‍यांच्या दुधाला मातीमोल भाव मिळत आहे.

- मिनाताई मुंगसे, सरपंच कडूस

गावातील जवळपास सगळेच शेतकरी दूध व्यवसाय करतात.दुधाला दर नसल्याने जनावरे सांभाळणे आता अवघड झालंय. आजचे दिवस बदलतील आणि चांगले दिवस येतील एवढ्याच आशेवर दूध व्यवसाय अनेक शेतकर्‍यांनी सुरू ठेवलाय.दूध धंदा तोट्यात करावा लागतोय पण आज ना उद्या दुधाला दर मिळेल, अशी आशा आहे.

- मीनाताई यादव, लोकनियुक्त सरपंच यादववाडी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com