शेतकर्‍यांनी जादा पैशाचे अमिष दाखवून ऊस हार्वेस्टिंग मशिन पळविले

शेतकर्‍यांनी जादा पैशाचे अमिष दाखवून ऊस हार्वेस्टिंग मशिन पळविले

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

अशोक सहकारी साखर कारखान्यास गळीतास जाणारा मागे राहिलेला उभा ऊस आता जाऊच शकत नाही या भितीने हतबल झालेल्या भामाठान शिवारातील सभासद शेतकर्‍यांनी जादा पैशाचे अमिष दाखवून चक्क कमालपूर शिवारातील ऊस हार्वेस्टिंग मशिन पळवून नेले.

या घटनेस चार दिवस उलटल्यानंतर कमालपूर शिवारात शेतकर्‍यांनी ओरड सुरू केल्यावर अशोक कारखाना शेतकरी अधिकारी, स्लिपबॉय खडबडून जागे झाले. 1 मे रोजी शेतकी अधिकारी यांच्या आदेशानुसार कमालपूर व भामाठानचे स्लीपबॉय सकाळी श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान परिसरात हार्वेस्टिंग मशिन अड्ड्यावर पोहचले. हार्वेस्टिंग मशिन मालक कर्मचारी कमालपूरला माघारी जाण्यास तयार झाले.

अगोदरच ठाण मांडून बसलेल्या पाच, पन्नास शेतकर्‍यांनी मशिन हलवू दिले जाणार नसल्याचा पवित्रा घेतला. शेतकी अधिकार्‍यांनी स्लीपबॉय यांना कारखाना स्लिप व शेतकर्‍यांचा कोड नंबर देऊ नका, अशा सूचना दिल्या. तरीही शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत यावर निर्णय न झाल्यास कमालपूरसाठी दुसरे हार्वेस्टिंग मशिन तातडीने द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

भामाठाण, कमालपूर शिवारात शेकडो एकर ऊस उभा असून दोन्ही गावात अगोदरचे प्रत्येकी एक एक हार्वेस्टिंग मशिन सुरू आहे. मात्र आता शेतकर्‍यांचे सहनशीलता संपत चालल्याने स्थानिक पातळीवर वाद उभे करण्यापेक्षा तातडीच्या ऊसतोडीवर उपाय शोधून शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी कारखाना संचालक मंडळ पदाधिकार्‍यांनी कार्यक्षेत्रात शिवार फेरी दौरा करावा,अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Related Stories

No stories found.