मोठे नुकसान होवूनही पाचेगाव-पुनतगावच्या शेतकर्‍यांना पीक विम्याची अत्यल्प रक्कम

तहसीलदार यांना निवेदन || लक्ष घालून 100 टक्के संरक्षित रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी
मोठे नुकसान होवूनही पाचेगाव-पुनतगावच्या शेतकर्‍यांना पीक विम्याची अत्यल्प रक्कम

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव व पुनतगाव येथील जवळपास साडेसातशे शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला. मात्र विमा कंपनीने शेतकर्‍यांच्या खात्यात अवघी हजार ते दीडहजार रुपये एवढीच रक्कम जमा केली असून आली असून कंपनीने शंभर टक्के रक्कम जमा करावी अशी मागणी पाचेगाव-पुनतगावच्या शेतकर्‍यांनी केली असून याबाबत नेवाशाच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसिलदार किशोर सानप यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले की, आमच्या भागात जवळपास साडेसातशे मिमी पाऊस पडला आहे. तसेच पाचेगाव परिसरात 17 सप्टेंबर रोजी एकाच दिवसात 68 मिमी पाऊस पडला. त्यात जवळपास सर्व शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांत अक्षरश पाणी वाहत होते. त्यात आमची पिके सडून गेली. उत्पादनात देखील मोठी घट दिसून आली.काही शेतकर्‍यांना अत्यल्प उत्पादन येऊन काढणीसाठी मात्र मोठा खर्च मोजावा लागला. नियमाप्रमाणे 72 तासाच्या आत आमची पिकांच्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीकडे ऑनलाईनच्या माध्यमातून नोंदवली.

त्यानंतर या भागात 15ऑक्टोबर ते 20ऑक्टोबर या पाच दिवसात पुन्हा अतिवृष्टी झाली, त्यात शिल्लक असणारे सर्व पिके संपुष्टात येऊन पिकांची नासाडी झाली.त्यानुसार आमच्या पिकांची पाहणी करून पंचनामा देखील विमा कंपनी प्रतिनिधी तसेच नेवासा तहसीलदार यांनी नेमलेल्या तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी केलेला आहे. या सर्वांनी नुकसान पाहणी करून वास्तव पाहिले आहे. 20 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांना बँकेतून पीक विमा कंपनीचे विमा रकमेचे वितरणाचे संदेश प्राप्त झाले. त्यात बहुतांश शेतकर्‍यांच्या खात्यात 1100 ते1500 रुपये रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आली.

इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन व या योजनेत सहभाग घेऊन शेतकर्‍यांना अशी तुटपुंजी रक्कम या विमा कंपनीने देऊ केली आहे. सदर रक्कम नुकसानाच्या किती टक्केवारीत शेतकर्‍यांना देण्यात आली,हे शेतकर्‍यांना समजनासे झाले. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. विमा कंपनीने नुकसान भरपाई म्हणून संरक्षित रकमेवर शंभर टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब उंडे, जालिंदर विधाटे, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष भगीरथ पवार, दिलीप पवार, सुधाकर शिंदे, भगवान साळुंके, राजू तांबोळी,सलीम शेख, रंगनाथ कुचेकर, दत्तात्रय पाटील, प्रकाश जाधव, भगवान शेळके, सीताराम घोगरे, मनोहर मतकर, हरी कहर, रमेश राजगुरू, बाबासाहेब मतकर, सुनील पठारे, नारायण नांदे, सुभाष गोलेचा, राजू कापसे आदी चारशे ते साडेचारशे शेतकर्‍यांच्या निवेदनावर सह्या आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com