शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून अच्छे दिनाचे केद्रांचे स्वप्न स्वप्नच राहिले

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून अच्छे दिनाचे केद्रांचे स्वप्न स्वप्नच राहिले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

2022 मध्ये शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून बळीराजाला अच्छे दिन दाखविण्याचे स्वप्न केंद्रातील सरकारने दाखविले होते. 2023 उजाडले मात्र उत्पन्न दुपटीमुळे येणार्‍या अच्छे दिनाचा मागमूस नसल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे.

याउलट पडलेले शेतमालाचे भाव, वाढलेले बियाणे, खते, डिझलचे भाव, रखडलेली अतिवृष्टीची मदत, रेंगाळलेली प्रोत्साहन योजना, रखडलेले पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे तीन वर्षाचे व्याज, पीक विम्यापासून वंचित राहिलेले अर्ध्याहून जास्त शेतकरी त्यामुळे नेमके हेच का अच्छे दिन? असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

परतीच्या पावसाने ऐन सोगणीच्या काळात फटका दिल्याने खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शासनाकडून एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट दराने मदत करण्याची घोषणा झाली. त्यांनतर 3 महिने उलटून गेले मात्र मदत मिळाली नाही. पिकविमा योजनेच्या माध्यमातून विमा घेणार्‍या शेतकर्‍यांनी कंपनीकडे दावे दाखल केले.

विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तिन-चार वेळेस कागदपत्र जमा केली. पंचनामे झाले मात्र मोठ्या प्रमाणावर शेतकरी अद्यापही परताव्यांपासून वंचित आहेत. वेळेवर कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी तीन तीन टक्के व्याज परतावा देते. यात राज्य सरकारकडून 2020, 21, 22 या तीन वर्षाचे व्याज परतावे मिळणे बाकी आहेत.

तर केंद्राचे सन 2021-22 या दोन वर्षाचे व्याज परतावे अद्याप मिळालेले नसल्यामुळे प्रामाणिक व वेळेवर कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होताना दिसत आहे. शेतीचे उत्पन्न व खर्च यामध्ये ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. 2022 मध्ये शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून अच्छे दिनाचे स्वप्न स्वप्नच असल्याचे चित्र आहे.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेली 50 हजारांची प्रोत्साहन योजनेची दुसरी व तिसरी यादी प्रसिध्द झाली. शेतकर्‍यांनी आधार प्रमाणिकरणही केले. त्यानंतर पंधरवाडा उलटून गेला अद्याप खात्यावर रकमा जमा नाहीत तर अद्यापही मोठ्या प्रमाणात नावे पोर्टलवर प्रसिध्द झाली नसल्याने योजनेच्या पूर्ततेबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com