
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती असून पाऊस न पडल्यास जनावरांच्या चार्याचा विषय गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने जनावरांच्या चारा निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात ज्या शेतकर्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय आहे, अशा शेतकरी-पशुपालक यांच्याकडून चारा निर्मितीसाठी पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागवले आहे. त्यानूसार 11 सप्टेंबरअखेर पशुसंवर्धन विभागाकडे 16 हजार 16 अर्ज दाखल झाले असून दाखल अर्जाची पडताळणी राज्य सरकारचा कृषी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. पडताळणीनंतर संबंधित शेतकरी- पशुपालकांना चारा निर्मितीसाठी बियाणे उपलब्ध करून देणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत अवघा 53 टक्के पाऊस झालेला आहे. यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यातील असून अकोले तालुक्यातील पाऊस जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या सरासरीतून वजा केल्यास जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ही 30 टक्क्यांपेक्षा अधिक नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे एकूण आतापर्यंत जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती गंभीर असून येणार्या काळात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पाण्यासह जनावरांच्या चार्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन आतापासून सर्तक झाले असून पाण्याच्या नियोजनासह चारा निर्मितीसाठी तयारी सुरू करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभाग वैरण विकास योजनेतून जिल्ह्यात चारा निर्मितीसाठी मका बियाणे खरेदी करून शेतकर्यांना ते वाटप करणार आहे. यासाठी सिंचनाची सोय असणार्या शेतकर्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. ज्या शेतकर्यांकडे पाणी आहे, त्यांना पशुसंवर्धन विभागाच्या ग्रामीण भागातील दवाखान्यांत अर्ज करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 16 हजार शेतकर्यांनी चारा उत्पादनासाठी अर्ज केले असून येणार्या अर्जाची कृषी विभागाच्यावतीने कृषी सहायक आणि पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर थेट संबंधीताच्या शेतापर्यंत जावून चारा उत्पादनासाठी सिंचनाची सोय आहे की नाही याची खात्री करणार आहेत. त्यानंतर संबंधीत शेतकर्यांना चारा तयार करण्यासाठी मका बियाणे वाटप करणार आहे.
पशुसंवर्धन विभागाकडे सध्या मका बियाणे खरेदी करून वाटप करण्यासाठी 1 कोटी रूपयांचा निधी असून जिल्हा नियोजन समितीमधून आणखी 2 कोटी रूपयांचा निधी पशुसंवर्धन विभागाला देण्यात येणार आहे. यासह गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाकडे 14 तालुक्यातून 16 हजार 16 शेतकर्यांचा चारा निर्मिती करण्यास तयार असल्याचा अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी दिली.
तालुकानिहाय आलेले अर्ज
अकोले 3 हजार 21, पाथर्डी 489, श्रीगोंदा 1 हजार 52, कर्जत 258, राहाता 1 हजार 190, शेवगाव 841, जामखेड 287, कोपरगाव 258, नेवासा 1 हजार 857, राहुरी 1 हजार 483, नगर 770, पारनेर 825, संगमनेर 3 हजार 101, श्रीरामपूर 323 असे आहेत.
शेतकर्यांकडून चारा उत्पादनासाठी येणार्या अर्जाची पडताळणी तालुकानिहाय कृषी विभाग आणि पशुसवंर्धन विभाग करणार आहे. अर्ज करणार्या शेतकर्यांच्या शेतात जावून त्याच्याकडे सिंचनाची सोय आहे की नाही, याची खात्री केल्यानंतर त्याला चारा निर्मितीसाठी बियाणे देण्यात येणार आहे. काही तालुक्यात बियाणे पोहच करण्यात आले असून लवकर शेतकर्यांना वाटप करण्यात येणार आहे.
- डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, अहमदनगर.