
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतीच्या वादातून बाप-लेकावर कुदळ व लोखंडी दातळाने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. दिलीप शंकर कार्ले (वय 64) व अमर दिलीप कार्ले (दोघे रा. सोनेवाडी तलावाजवळ, चास ता. नगर) अशी जखमी बाप-लेकांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान जखमी दिलीप कार्ले यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून मारहाण करणार्या दोघांविरूध्द खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली असून 1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत उर्फ भावड्या शिवाजी कार्ले व शिवाजी लक्ष्मण कार्ले (दोघे रा. सोनेवाडी तलावाजवळ, चास) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी व शिवाजी कार्ले हे शेजारी राहण्यास असून त्यांची शेती शेजारी शेजारी आहे. 31 जानेवारीला फिर्यादी हे शेतात उसाच्या पिकास पाणी देत असताना फिर्यादीच्या उसातून व बांबू लागवड क्षेत्रातून जेसीबी गेल्याचे व त्यामुळे बांबूचे व उसाचे नुकसान झाल्याचे दिसले.
त्या वेळी फिर्यादीचे शेताशेजारील रोडवरून जेसीबी चाललेला दिसला असता त्यास थांबवून विचारले की,‘तु सदर जेसीबी माझे शेतात घालून उसाचे व बांबुचे नुकसान का केले व तुला येथून जेसीबी कोणी घालण्यास सांगितले’. असे विचारत असताना फिर्यादीस प्रशांत कार्ले याने शिविगाळ करून हातातील कुदळीने तर शिवाजी कार्ले याने लोखंडी धारदार पाते असलेला दातळाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने आरडाओरडा केला असता ते पाहुन फिर्यादीचा मुलगा अमर दिलीप कार्ले व पत्नी सुलोचना दिलीप कार्ले हे पळत भांडण सोडविण्यासाठी आले असता फिर्यादीचा मुलगा अमर यास प्रशांत याने त्याचे हातातील कुदळीने खांद्यावर मारले त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी त्यास वाचविण्यासाठी गेलो असता प्रशांतने परत अमरला खाली पाडुन लाथाबुक्कक्यांनी जबर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास सुरू केला आहे.