प्रेमाचं अनोखं उदाहरण! आयुष्यभर इमाने इतबारे साथ देणाऱ्या 'देवमन'ला बळीराजानं दिला 'यादगार' निरोप

प्रेमाचं अनोखं उदाहरण! आयुष्यभर इमाने इतबारे साथ देणाऱ्या 'देवमन'ला बळीराजानं दिला 'यादगार' निरोप

श्रीगोंदा | प्रतिनिधी

शेती, शेतकरी आणि वृषभ राजा आपल्या कृषी व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा, दाण्यापाण्याचा, सगळ्या जगण्याचा कणा. शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की त्याचे आपल्या मुलाबाळांवर आपल्या कुटुंबावर प्रेम असते तेवढेच प्रेम शेतीसाठी राबणाऱ्या आपल्या वृषभ राजावर म्हणजे आपल्या बैलावर असते.

शेतकरी आणि बैल याचे अतूट आणि भावनिक नाते असते. याचाच प्रत्यय आला श्रीगोंदा तालुक्यातील भावडी गावात. भावडीतील नवनाथ भोसले या शेतकऱ्याकडे असणाऱ्या बैलजोडीतील देवमन नावाच्या बैलांच्या मृत्यूनंतर या कुटुंबाने या बैलांच्या अंत्यसंस्कारापासून ते दशक्रिया विधीपर्यंतचे सर्व धार्मिक विधी पार पाडत देवमनला यादगार निरोप दिला.

नवनाथ भोसले यांच्याकडील गावरान गाईला झालेला गोऱ्हाचा जन्म १९९८ रोजी झाला. त्याचे नाव देवमन असे ठेवले. या बैलांच्या जन्मापासून या कुटुंबाची आर्थिक भरभराट झाली. या घरच्या बैलामुळे शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करायला देवमनच्या जोडीसाठी त्याचाच मामा बैल पोपट्या या दोघांची एवढी मोठी साथ होती. यातून घरची परिस्थिती सुधारणा करत नवनाथ भोसले यांनी आपला मुलाला उच्च शिक्षण देत वन अधिकारी बनवले.

आपल्या दोन मुलींच्या विवाह अतिशय चांगल्या ठिकाणी करून दिला. देवमन बैलाचा विशेष असा गुण होता जर घरी नवनाथ भोसले नसतील किंवा त्यांच्या पत्नीस घरी एकटी राहण्याची वेळ आली तर देवमन बैल हा आपला मालक घरी येईपर्यंत खाली बसत नसायचा. भोसले यांनी देवमन बैल जाण्याच्या अगोदर त्याला तीन ते चार वर्ष कोणतेही प्रकारचे शेतीतले काम करू दिले नाही एखाद्या वृद्ध माणसाप्रमाणे भोसले कुटुंबाने त्याचा सांभाळ केला.

आपल्या जोडीदार बैलाच निधन झाल्यानंतर आपला मित्र गेल्याने देवमन बैल हा माणसाप्रमाणे रडत होता. असे भोसले कुटुंबाने सांगितले. देवमन बैलाचा सांभाळ नवनाथ भोसले यांच्या पत्नी शोभाताई भोसले यांनी आपल्या मुलाप्रमाणे केला. त्यांना देवमनची आठवण झाली तर त्या गोठ्यात बैल बांधलेल्या जागेवर जाऊन त्याची आठवण काढतात. बैल रूपाने मिळालेला तो माझा दुसरा मुलगा होता अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com