शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई- कृषीमंत्री मुंडे

आणखी दोन लाख टन कांदा खरेदीचा निर्णय
धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली असून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे. त्यांना काही दिवसांची मुदत दिली असून ज्या महसूल मंडळात सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आणि ज्या महसूल मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, अशा अधिसूचित केलेल्या मंडळांच्या क्षेत्रातील शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचा विचार सुरू असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्री मुंडे यांच्या हस्ते शनिवारी नगरमध्ये शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील अनेक भागात पाऊस कमी झाला आहे, पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारी असल्याचे मंत्री मुंडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ज्या महसूल मंडळात सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आणि ज्या महसूल मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, अशा अधिसूचित केलेल्या मंडळांच्या क्षेत्रातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

परंतू, काही अधिसूचित मंडळाच्या बाबतीत पीक विमा कंपन्यांना अडचणी होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यांना काही दिवसांची मुदत दिली आहे. अधिसूचित केलेल्या सर्व मंडळांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ती दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कांद्याला भाव मिळत नसल्याने नाशिकमध्ये उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले असे मंत्री मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारने यापूर्वी 2710 भावाने कांदा खरेदी केला. आता 2150 रूपये भावाने आणखी दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे; पण काही लोक त्यांची उपद्रवीमुल्य दाखवून राजकारण करत आहे. त्यांच्याकडून फक्त विरोधाला विरोध सुरू असल्याचे ते म्हणाले.

...म्हणून आम्ही ‘तो’ फोटो वापरतो

आमचे दैवत शरद पवार यांनी आम्हा भक्तांना त्यांचा फोटो वापरला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा फोटो न वापरता ते स्व.यशवंतराव चव्हाण यांना गुरू मानत असल्याने आम्ही स्व.चव्हाण यांचा फोटो वापरतो. उद्या शरद पवार यांचा फोटो वापरला तर त्यांना आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही त्यांचा फोटो वापरत नसल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com