‘त्या’ वंचित शेतकर्‍यांची पीक विमा रक्कम खात्यात वर्ग
सार्वमत

‘त्या’ वंचित शेतकर्‍यांची पीक विमा रक्कम खात्यात वर्ग

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ

Arvind Arkhade

कर्जत |वार्ताहर| Karjat

कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या पीकविमा प्रश्नी आ. रोहित पवार यांनी स्थानिक प्रशासन ते राज्य सरकार, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण जिल्ह्यातील 1 लाख 48 हजार शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून शेतकर्‍यांच्या खात्यात 140 कोटी वर्ग झाले आहेत. आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघासह जिल्ह्याची प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2018-19 रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम अडकून पडली होती. लोकसभा निवडणुकीपासून ही रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी मतदारसंघातील शेतकर्‍यांनी आ.रोहित पवार यांच्याकडे केली होती. रखडलेला पीक विमा मिळवून देण्याचे आश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता.

हा पीकविमा मिळण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण सोडविण्यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी संबंधित पीक विमा कंपनी व केंद्र सरकारशी संपर्क साधत वंचित शेतकर्‍यांना पुन्हा एकदा अटींची पूर्तता करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या योजनेत शेतकर्‍यांना तीन टप्प्यात मिळालेल्या रकमेचा आकडा हा 191.58 कोटीवर झाला आहे.

पहिल्या टप्प्यात गत ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यासाठी 49.17 कोटी मिळाले. त्यामध्ये जामखेडसाठी 12.15 कोटी व कर्जत 5.46 कोटी, दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारी महिन्यांच्या दरम्यान या रकमेत वाढ होऊन जिल्ह्याची रक्कम 89.88 कोटी झाली. त्यामध्ये कर्जतच्या रकमेत 33 कोटींची वाढ झाली तर जामखेडच्या रकमेत 20.34 कोटींची वाढ झाली.

तिसर्‍या टप्प्यात जुलैच्याअखेरीस 191.58 कोटी आले. त्यामध्ये कर्जतच्या रकमेत 47.56 कोटी तर जामखेडसाठी 32.18 कोटी एवढी आतापर्यंत वाढ झाली आहे. आता उर्वरित रक्कमही शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झाल्याने आ. पवारांची पॉवर शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने फेव्हर ठरली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून ही रखडलेली रक्कम अखेर शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com