शेतकर्‍यांचे कापसात गाडून घेत अभिनव आंदोलन

अनुदान न मिळाल्याने आखतवाडी येथीेल शेतकरी संतप्त
शेतकर्‍यांचे कापसात गाडून घेत अभिनव आंदोलन

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान दिले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी तालुक्यातील आखतवाडे येथे साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढीगार्‍यात स्वत:ला गाडून घेत अभिनव आंदोलन केले.

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्या नेतृत्वाखालील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी केलेले हे अनोखे आंदोलन परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. कापूस उत्पादनात शेवगाव तालुक्याने गेल्या काही वर्षात जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. मागील हंगामात शेवगाव तालुक्यात 48 हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना जवळपास 10 हजार रुपये क्विंटल भावाची आस लागली होती.

मात्र शेतकर्‍यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. सध्या 7 हजार ते 7 हजार 500 रुपये भाव मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी भाव वाढतील या आशेने आपला कापूस बरेच दिवस घरात साठवून ठेवला होता. यापासून अनेकांना विविध आजारांचा सामना करण्याची वेळ आली. तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रती क्वींटल 4 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आखतवाडे येथील शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेल्या कापसाच्या ढिगार्‍ये स्वत:ला गाडून घेत अंदोलन केले. यावेळी अशोक उगले, संजय उगले, विशाल राशिनकर, देवीदास शेळके, राहुल राशिनकर, सोमनाथ सोलाट आदींसह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com