आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे
सार्वमत

कोपरगाव : शेतकर्‍यांच्या खात्यात 1.40 कोटी जमा

पंतप्रधान शेतकरी योजनेबाबत आ. काळेंच्या पाठपुराव्यास यश

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

पहिल्याच जनता दरबारात अनेक शेतकर्‍यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या होत्या. योजनेच्या लाभापासून वंचित शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जवळपास सात हजार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला असून शेतकर्‍यांच्या खात्यात 1.40 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून देशातील शेतकर्‍यांसाठी मागील वर्षापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून सरकारकडून शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचे पहिला टप्पा मागील वर्षी पार असून मतदार संघातील अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते.

त्याबाबत शेतकर्‍यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जनता दरबारामध्ये योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत आ. आशुतोष काळे यांच्यापुढे असंख्य शेतकर्‍यांनी मांडल्या होत्या. त्याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे व कृषी विभागाला त्यांनी योजनेपासून वंचित असणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी येत असलेल्या अडचणी जाणून घेत जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला होता.

त्या पाठपुराव्यातून योजनेपासून वंचित असणार्‍या सात हजार शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. योजनेचे आजपर्यंत दोन टप्पे पार पडले असून लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण पाच हफ्त्यात आजपर्यंत 24 कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे.

ज्या वंचित लाभार्थ्यांना पाच ह्फ्त्यांपैकी फक्त दोन हजार रुपयांचा एकच हफ्ता मिळाला त्या शेतकर्‍यांना अजून चार ह्फ्त्यांची रक्कम रुपये आठ हजार मिळावे व ज्या शेतकर्‍यांनी योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही काही शेतकरी अजूनही या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकर्‍यांना तातडीने या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविलेल्या पत्रात केलेली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com