ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याने शेतात घुसले पाणी
सार्वमत

ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याने शेतात घुसले पाणी

नुकसान भरपाईची मागणी : ..अन्यथा डुकरे वस्तीही होईल जलमय

Arvind Arkhade

आंबी|वार्ताहर|Ambi

आंबी व अंमळनेर परिसरात नुकत्याच झालेल्या 62 मिलीमीटर मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात पाणी साचल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

आंबी येथील सरई परिसरातून गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने ओढा वाहत होता. मात्र मागील काही वर्षांत सदर ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाऊन पर्यायी मार्गाने पाणी वळविण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पाणी नैसर्गिक रीतीने वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन हे पाणी परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात घुसले.

अशीच काही परिस्थिती अंमळनेर भागातही झालेली दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांचे मका, सोयाबीन, कपाशी, फळबागा, चारापिके हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी हैराण झाला आहे. शेजारील डुकरे वस्तीला पाणी खेटले असून अजून अतिवृष्टी झाल्यास या वस्तीमध्ये पाणी घुसण्याची भीती निर्माण झाली आहे.

करोनाच्या संकटाने आधीच बळीराजा मेटाकुटीला आला असताना या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांवर आस्मानी संकट ओढवले आहे. कर्ज काढून, उधारी उसनवारी करून शेतीची मशागत, पेरणी करून कशीबशी पिके जगवली. मात्र आलेल्या या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकर्‍यांना सतावत आहे.

दरम्यान सदर भागाची कामगार तलाठी रूपेश कारभारी, कृषी सेवक कचेश्वर काळे, कोतवाल सचिन रणदिवे यांनी पाहणी केली. यावेळी आंबीच्या सरपंच वंदनाताई अशोक साळुंके, माजी सरपंच हरिश्चंद्र साळुंके, बापु साळुंके, अंमळनेरचे सरपंच रोहन जाधव, माजी उपसरपंच विजय डुकरे, भागवत कोळसे आदींनी सदर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

आंबी व अंमळनेर परिसरातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून महसूल प्रशासन व कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत. या कामी आंबी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.

- वंदनाताई साळुंके (सरपंच आंबी)

अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांच्याशी चर्चा केली असून त्यांचा आदेश येताच नुकसानीचे पंचनामे करण्यासंबंधी पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल.

- रूपेश कारभारी (कामगार तलाठी, आंबी)

Deshdoot
www.deshdoot.com