3 हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान

पावसाचा तडाखा || जून ते सप्टेंबर मोठा फटका
file Photo
file Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांची स्थिती उत्तम आहे. मात्र, काही ठिकाणी जून ते सप्टेंबर या काळात टप्पाटप्प्याने अतिवृष्टी अथवा ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. यामुळे या कालावधीत जिल्ह्यात 3 हजार 82 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात जून ते ऑगस्टअखेर 1 हजार 330.41 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने या कालावधीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी राज्य सरकारला पाठवली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 86.9 टक्के सरासरीने 389.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. या पावासामुळे खरीप हंगामातील पिके जोमात असून अनेक ठिकाणी तलाव, पाझर तलाव, साठवण बंधारे यासह छोटे, मोठे तलाव, मध्यम प्रकल्प तुंडूब झालेले आहे. जिल्ह्यासाठी वरदान असणार्‍या मुळा, भंडारदार, निळवंडे आणि दक्षिण जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.

मात्र, अनेक ठिकाणी मुसळधार ते ढगफुटीसदृष्य पाऊस झालेला आहे. यात जून ते सप्टेंबरच्या प्रारंभाअखेर 3 हजार 82 हेक्टरवरील पिकांना त्याचा फटका बसला आहे. यात जूनमध्ये 127.9 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. जुलै महिन्यांत 432.82 हेक्टर तर ऑगस्ट महिन्यांत 769.69 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसलेला आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे.

दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील उत्तर भागात प्राथमिक माहितीनूसार 1 हजार 763 हेक्टरवरील पिकांना ढगफुटीसदृष्य पावसाचा फटका बसला असून अनेक महसूल मंडळात 158 मिलीमीटरच्या जवळपास पावसाची एकाच दिवसात नोंद झालेली आहे. याबाबतची माहिती अद्याप शासनाला देणे बाकी असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजानूसार जिल्ह्यात या महिन्याअखेर एक किंवा दोनदा अतिवृष्टीची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग धास्तीत आहे.

तुटपुंजी भरपाई ?

जून ते ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून शेतकर्‍यांना मिळणारी भरपाई ही शिंदे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे प्रती हेक्टरी दुप्पटीने मिळणार आहे. आधी शेतकर्‍यांना मिळणारी भरपाई ही जास्तीजास्त दोन हेक्टरपर्यंत होती. आता ती प्रती शेतकरी तिन हेक्टरप्रमाणे मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतजमीनीचे खातेफोड झालेले आहे. यामुळे सरकारच्या घोषणेनंतर मिळणारी भरपाई ही तुटपुंजी ठरण्याचा अंदाज आहे.

अन्य नुकसान

जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत नेवासा, पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी 1 पशूधनाचा बळी गेला. तर 24 घरांचे नुकसान झालेले असून यात कोपरगाव 5, राहाता 10 आणि संगमनेर 19 यांचा समावेश आहे. तर राहाता येथील 45 घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याचे जिल्हा आपत्ती कक्षाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com