श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शेतमजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय यांस अनुसरून विविध 29 मागण्यांची सनद तातडीने मंजूर करावी, याकरिता पुकारण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांचेमार्फत निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीमती मगरे यांनी निवेदन स्वीकारले.
देशव्यापी शेतमजूर परिषेदेत विविध संघटनांनी मंजूर केलेल्या 29 मागण्यांना घेउन दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी अण्णाभाऊ साठे यांचे जयंती दिनी देशभर जिल्हा, तालुका स्तरावर मागणी दिन साजरा करून निवेदन देण्यात आले. निवेदनात मनरेगा अंतर्गत 600 रुपये मजुरी व प्रती जॉबकार्ड धारकास प्रतिवर्ष 200 दिवस काम देण्यात यावे, मनरेगा योजनेत काम करणार्या तांत्रिक कर्मचारी व अन्य कर्मचार्यांना नोकरीची हमी द्यावी, मनरेगा शहरी भागातही लागू करावा, सर्व भूमिहीन, बेघरांना घरासाठी जागा, किचन, गार्डन, शौचालय व गोठा (जनावरांसाठी) इत्यादीसह किमान 5 लाख रुपये किमतीचे घरकुल द्यावे, 55 वर्षावरील सर्व स्त्री पुरुष शेतमजुरांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात यावी, सार्वजनिक वितरण प्रणाली व्यापक व भक्कम करून त्याद्वारे तांदूळ, गहू याशिवाय डाळी, तेल, साखर, मसाले, भाजीपाला व इतर जिवनावश्यक वस्तुंचा स्वस्त दारात पुरवठा करावा, यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी आंदोलनात श्रमिक महासंघाचे राज्याध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, राजेंद्र मुसमाडे, उत्तम माळी, प्रकाश भांड, हसन शेख, बाळासाहेब कराळे, रंगनाथ दुशिंग, नानासाहेब तारडे, आसरू बर्डे, अनिल बोरसे, प्रकाश मोरे, अजय बर्डे, नितीन दरंदले, अजय बत्तीशे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.