दीड वर्षांपूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला गर्भधारणा
सार्वमत

दीड वर्षांपूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला गर्भधारणा

वडाळ्याच्या खासगी रुग्णालयाविरोधात तक्रार; जिल्हा शल्यचिकित्सकांकडे कारवाईची मागणी

Arvind Arkhade

खरवंडी|वार्ताहर|Kharvandi

दीड वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करूनही झालेल्या गर्भधारणेमुळे मोठा आर्थिक मानसिक त्रास देऊन वरून अरेरावीची भाषा करणार्‍या वडाळा बहिरोबा येथील एका खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी सतीश मोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात मोटे यांनी म्हटले की, सप्टेंबर 2018 मध्ये त्यांच्या पत्नीची वडाळा बहिरोबा येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. पहिला मुलगा असताना यावेळी त्यांना मुलगी झाल्याने त्यांनी याच दवाखान्यात पैसे भरून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही करून घेतली.

दि.1 जून 2020 रोजी मोटे यांच्या पत्नीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तपासणी व उपचारासाठी त्यांना याच दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुतखडा झाल्याचे निदान केले. त्यांच्या पत्नीला संपूर्ण दिवस आणि रात्रभर या रुग्णालयात दाखल करून गोळ्या, इंजेक्शन व सलाईनचा मारा करूनही दुखणे कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने त्यांनी नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखान्यात धाव घेतली.

या दवाखान्याच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यावर गर्भधारणेचे निदान केल्यावर या उभयतांना मोठा धक्काच बसला. दीड वर्षांपूर्वी कुटुंबनियोजनची शस्त्रक्रिया केलेली असल्याने गर्भधारणा कशी होऊ शकते? असा प्रतिसवाल या उभयतांनी उपस्थित करूनही डॉक्टर त्यांच्या निदानावर ठाम राहिले. त्यांच्या खात्रीसाठी श्रीरामपूर येथील एका तपासणी केंद्रातून सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला.

या सोनोग्राफीचा अहवाल पाहिल्यावर गर्भ खराब झालेला असून सेप्टीक होऊन त्याचे विष शरिरात सर्वत्र पसरण्याचा धोका लक्षात आणून दिल्यानंतर अहमदनगर येथील एका प्रथितयश डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन हा खराब झालेला गर्भ तातडीने काढून टाकावा लागल्याचे मोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबाला या प्रकारामुळे नाहकच मोठा आर्थिक भुर्दंड बसून कर्जबाजारी व्हावे तर लागलेच परंतु मानसिक त्रासही सहन करावा लागल्याने त्यांनी या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना भेटून जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून, तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची ती करा, आम्ही सर्वांना खिशात घातले आहे अशी भाषा वापरून हुसकावून दिल्याचा आरोप मोटे यांनी या निवेदनात केला आहे.

पोटात दुखत असल्यामुळे पत्नीला हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारासाठी नेले असता या रुग्णालयाच्या महिला वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर गर्भधारणा झाल्याचे लपवून मुतखड्याचे निदान करून गर्भपाताचे इंजेक्शन तसेच हेवी पेनकिलरचा डोस दिल्यामुळेच गर्भ खराब झाल्याची दाट शक्यता आहे. डिग्री, अनुभव तसेच सुविधा नसताना लोकांच्या जीविताशी खेळ करण्याचे अनेक प्रकार या रुग्णालयात घडलेले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते.

- सतीश मोटे, तक्रारदार

Deshdoot
www.deshdoot.com