हुंड्यासाठी छळ; लोणी खुर्द येथील मापारी कुटुंबाच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा
सार्वमत

हुंड्यासाठी छळ; लोणी खुर्द येथील मापारी कुटुंबाच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

लग्नाच्या दिवसापासून पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील लोणी खुर्द (मापारवाडी) येथील मापारी कुटुंबाच्या सहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सौ. शितल प्रशांत मापारी (रा. मापारवाडी,लोणी खुर्द) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, माझे माहेर कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील असून प्रशांत तान्हाजी मापारी याच्या सोबत 27 मे 2017 रोजी विवाह झाला. विवाहासाठी माझ्या वडिलांनी 7 लाख रुपये खर्च केला.

पण विवाहाच्या वेळीच सासरच्या लोकांनी 5 लाख रुपये हुंड्याची मागणी केली.ती माझे वडील पूर्ण करू शकत नव्हते. मी सासरी आल्यानंतर सासरे, सासू, पती, दीर, जाऊ, भाया यांनी मला सतत हुंड्याची मागणी करीत शारीरिक,मानसिक त्रास दिला. अनेकदा मारहाण केली. धोंड्याच्या महिन्यात एक तोळा सोन्याच्या अंगठीची मागणी केली. मी गरोदर राहिले.

मला माहेरी पाठवून दिल्यावर पुन्हा कुणी भेटायला सुद्धा आले नाही. मी मुलीला जन्म दिला म्हणून मुलासाठी माझा छळ सुरु केला. माझ्या वडिलांनी फेब्रुवारी 2019 मध्ये सासरच्या लोकांना एक लाख रुपये दिले तरी त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी राहिलेल्या चार लाखांची मागणी चालूच ठेवली.

माझ्या सासूने मला एक तोळे सोन्याची पोथ माहेरकडून करून आणायला सांगितली. माझ्या वडिलांनी तीही करून दिली. तरीही माझा त्रास कमी झाला नाही.मी दुसर्‍यांदा गरोदर राहिले. हुंड्याच्या पैशांसाठी मला पाच महिने आधीच माहेरी पाठवून दिले. मला कुणीही भेटायला आले नाही. मी मुलाला जन्म दिला.

मला कुणी न्यायला सुद्धा आले नाही. मला हुंड्यासाठी छळ करणार्‍या तान्हाजी नामदेव मापारी (सासरे), सरिता तान्हाजी मापारी (सासू), प्रशांत तान्हाजी मापारी (पती), श्रीकांत तान्हाजी मापारी(भाया), रुपाली श्रीकांत मापारी (जाऊ) आणि प्रवीण तान्हाजी मापारी (दीर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.

लोणी पोलिसांनी भादवी कलम 498 (अ), 406, 323, 504, 506, 34, हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला.पुढील तपास सपोनि प्रकाश पाटील करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com