खोट्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

खोट्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आले समोर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नेवासा पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेला काम करणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍याच्या संभाषणाची ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तो कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे या संभाषणातून समोर आले आहे. याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याशी संबंधीत वेगवेगळ्या ऑडिओ क्लीप समोर येत आहेत. यामुळे नेवासा पोलीस ठाणे बदनाम झाले आहे. पोलीस कर्मचारी व अपर पोलीस अधीक्षक यांच्यातील हप्तेखोरीचे संभाषण, यानंतर पोलीस निरीक्षकाचे वाळूतस्कराशी झालेले संभाषण चांगलेच व्हायरल झाले होते. आता नेवासा वाहतूक शाखेत ड्युटी करत असलेला पोलीस कर्मचारी वाहन चालकाशी समोरासमोर बोलत असल्याचे संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. हा वाहन चालक प्रवासी संघटनेचा पदाधिकारी आहे.

13 मिनिटांच्या या संभाषणातून वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड झाली आहे. त्याचबरोबर कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस कर्मचार्‍याकडून अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी दिली जात असल्याचे यातून समोर आले आहे. अवैध प्रवासी वाहतूक व यातून पोलिसांना दिले जाणारे हप्ते या संभाषणातून अधोरेखित झाले आहे.

कर्मचार्‍यांची मुजोरी वाढली

नेवाशातील परमीट प्रवासी वाहतूक संघटनेने अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून केली होती. यानंतर त्या कर्मचार्‍याने खोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. वाहतूक शाखेतून काढले तर अ‍ॅट्रोसिटी दाखल करेल, पोलीस ठाण्यात राजकारण करेल, असे त्याने म्हटल्याचे ऑडिओ क्लीपमधून समोर आले आहे. कर्मचार्‍याची मुजोरी यातून समोर येते. वरिष्ठांपर्यंत ही ऑडिओ क्लीप गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या क्लीपवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून काय दखल घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com