नोकरीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र, एकावर गुन्हा

भिंगारच्या आर्मड रेजिमेंटमधील प्रकार
नोकरीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र, एकावर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सैन्यदलात भरती होण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीणकुमार एस (वय 21 रा. कुकुलम ता. तेरूमंगलम जि. मदुराई, तामिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भिंगार येथील आर्मड रेजिमेंटचे अधिकारी एल. भुपेंदर सिंग (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे. 23 डिसेंबर 2019 ते 4 जून 2021 यादरम्यान ही घटना घडली. बुधवारी (दि. 30) याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीण कुमार याच्याविरोधात तामिळनाडूतील शोलावंदन पोलीस ठाण्यात 2017 मध्ये भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्ह्याची माहिती लपवून प्रवीण कुमार याने आर्मड रेजिमेंट येथील सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. सदरची बाब उघडकीस आल्यानंतर त्याची पडताळणी करून आर्मड रेजिमेंटचे अधिकारी एल. भुपेंदर सिंग यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण कुमारविरोधात भादंवि 420, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार दहीफळे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com