मनपाच्या पत्राला प्रांताधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली

बनावट एनओसी प्रकरण; माहिती देण्यास टाळाटाळ
मनपाच्या पत्राला प्रांताधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणात महापालिकेमार्फत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीसाठी मनपाने प्रांताधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाकडून अद्यापही मनपाला माहिती उपलब्ध झालेली नाही. सदरचे प्रकरण गंभीर असतानाही व प्रांत कार्यालयाकडून माहिती अधिकारात यापूर्वीच माहिती दिलेली असतानाही महापालिकेला माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने प्रांताधिकारी कार्यालयाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरकडून मागील सहा वर्षांत एकही एनओसी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शाकीर शेख यांनी महापालिकेतही पत्र देऊन त्यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या एनओसीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्यामार्फत याची चौकशी सुरू केली आहे.

नगररचना विभागाने चौकशीसाठी कागदपत्रे सादर केली असून, त्यांच्याकडे प्राप्त झालेली एनओसी खरी आहे की बनावट, तसेच सदरची एनओसी व त्याच्यासमवेत असलेली कागदपत्रे प्रांताधिकारी कार्यालयाने सादर केलेली आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी चार दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी कार्यालयाला पत्र पाठवले आहे. 24 तासांच्या आत तातडीने याची माहिती देण्यात यावी, असे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

प्रांताधिकारी कार्यालयाकडून मात्र या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असताना व प्रांताधिकारी कार्यालयाने बनावट एनओसीद्वारे आपली फसवणूक झाल्याची फिर्याद यापूर्वीच पोलीस ठाण्यात दिलेली असताना, तसेच माहिती अधिकारात शेख यांना याबाबत स्पष्टपणे माहिती दिलेली असतानाही महापालिकेला मात्र माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com