बनावट मेसेजद्वारे वकिलाची फसवणूक

सायबर चोरट्याने खात्यातून 50 हजार घेतले काढून
बनावट मेसेजद्वारे वकिलाची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इलेक्ट्रीक ऑफिस कस्टमर सर्व्हिसमधून बोलतो, वीज बिल थकले आहे, बिल भरणा करावा लागेल, अन्यथा वीज कट होईल, असे खोटे सांगून विश्वास संपादन करत एका वकिलास सायबर चोरट्यांनी फसविले. त्यांच्या खात्यातून 49 हजार 500 रूपये काढून घेतले. संबंधीत वकिलांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420, सह आयटी अ‍ॅक्ट कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज बिल भरणा करण्यासाठी मोबाईलवर मेसेज येत आहे. या मेसेजला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. असाच हा प्रकार झाला आहे. 7 जुलै ते 11 जुलै, 2022 दरम्यान ही घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील हनुमानटाकळी येथील रहिवाशी असलेले फिर्यादी यांना एका नंबरवरून फोन आला व तो व्यक्ती त्यांना म्हणाला, इलेक्ट्रीक ऑफीस कस्टमर सर्व्हिसमधून बोलतोय, असे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यांना मोबाईलवर 'paytm' व 'Quik Support' नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

फिर्यादी यांनी अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. तो ओटीपी त्यांना दुसर्‍या नंबरवर पाठविण्यास सांगितले. काही वेळाने फिर्यादी यांच्या खात्यातून 49 हजार 500 रूपये कट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादी यांनी मंगळवारी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com