खोटे लग्न लावून देणार्‍या आळंदी येथील महिलांच्या टोळीची सुकेवाडीत धुलाई

3 नवरदेवांकडून साडेतीन लाख रुपये घेतले
लग्न (File Photo)
लग्न (File Photo)

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

खोटे लग्न लावून देणार्‍या पुणे जिल्ह्यातील महिलांच्या टोळीने तालुक्यातील सुकेवाडी येथील तिघांची तब्बल साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलांना पिंपरी चिंचवड येथून सुकेवाडी आणण्यात आले यानंतर संतप्त नागरिकांनी या महिलांची येथेच्छ धुलाई केली. मारहाणीच्या भीतीने एक नवरी मात्र नांदण्यास तयार झाली. घेतलेले पैसे आठ दिवसात परत देण्याचे पोलीस ठाण्यात कबूल घेतल्यानंतर या महिलांना सोडून देण्यात आले.

खोटे लग्न लावून देणार्‍या महिलांच्या टोळ्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या टोळीतील महिलांकडून आतापर्यंत अनेकांची लूट करण्यात आली आहे. सुकेवाडी येथील युवकांनाही त्याचा अनुभव आला. सुकेवाडी येथील दोन व कोकणगाव येथील एक जण अनेक दिवसांपासून नवरीच्या शोधात होते. सुकेवाडी येथील एका महिलेने हे या नवरदेवाची अडचण बरोबर हेरली. आपण लग्नाची जमवाजमव करतो असे सांगून या युवकांना मुली शोधल्या. चार दिवसापूर्वी या महिलेने अचानक या मुलींना सुकेवाडीत आणले.

कुठल्याही विधी न करता एकाच दिवशी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नासाठी एका नवरदेवाकडून दीड लाख रुपये व इतर दोघांकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेण्यात आले. लग्नानंतर तिसर्‍या दिवशी या नवर्‍या पळून गेल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या नवरदेवांनी दलाल महिलेस गाठून तिला जाब विचारला. सदर महिलेने नवीन नवर्‍याचा पत्ता सांगितला. यानंतर काही लोकांनी या महिलेस घेऊन थेट पिंपरी चिंचवड गाठले. काल रात्री त्यांना सुकेवाडी येथे आणण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी त्यांची चांगली धुलाई केली. यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ग्रामस्थांचा संताप पाहून एक जण नांदण्यास तयार झाली तर दोघींनी आठ दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. दलाल महिलेने पैसे काढून देण्याची जबाबदारी घेतली आहे.

सुकेवाडी येथे लग्न लावण्यात आलेल्या तीन पैकी दोघींचे यापूर्वी सात ते आठ वेळा लग्न झालेले आहे. यातील एकीला बारा वर्षांची मुलगी पण आहे. दलाल महिला लग्न जमून देण्यासाठी पंधरा हजार रुपये घेत होती. पंधरा हजार रुपयासाठी सदर महिलेने तिघांचे लग्न लावून दिले. लग्न झालेल्यांपैकी एक जण होमगार्ड दुसरा मेंढपाळ तर तिसरा शेतकरी आहे. सुकेवाडी येथील या बनावट लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. लग्न जमवताना पालकांनी संपूर्ण चौकशी करूनच लग्न जमवावे यामुळे संभाव्य फसवणूक होणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com