मोबाईलवर आलेल्या बनावट लिंकने व्यावसायिकाला फसवले

बँक खात्यातून गेले एक लाख || कोतवाली पोलिसांंत गुन्हा
Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन दिवस सलग वारंवार मोबाईलवर टेक्स मेसेजव्दारे येत असलेल्या बनावट लिंकवर बँक खात्यासंबंधी माहिती भरल्याने एका व्यवसायिकाच्या खात्यातून 99 हजार 996 रुपये कपात झाल्याचे समोर आले आहे. रिजवान अहमद अमीन सय्यद (वय 49 रा. एमजी रोड, नगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कॅनरा बँक, वरळी शाखा, मुंबई येथील एका बँक खाते असलेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व्यवसायिक आहेत. ते शुक्रवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. त्या मेसेजमध्ये पॅनकार्ड अपडेट करा, असे लिहून आले होते. फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान त्याच दिवशी दुपारी व दुसर्‍या दिवशी (शनिवारी) सकाळी पुन्हा मोबाईलवर मेसेजव्दारे लिंक आल्याने फिर्यादीने ती लिंक ओपन केली.

त्यामध्ये बँक केवायसी असे लिहलेले होते. त्यामध्ये फिर्यादीने त्यांच्या एचडीएफसी बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकले. त्यानंतर मोबाईल नंबर टाकला. नंतर पॅनकार्ड नंबर आणि जन्म तारीख विचारण्यात आली. फिर्यादीने ती टाकल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार 996 रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर आला.

त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार 996 रूपये कॅनरा बँक, वरळी शाखा, मुंबई येथील एका व्यक्तीच्या खात्यात गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाली आहे, असे सय्यद यांना समजताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार पटारे करीत आहेत.

एक क्लिक पडते महागात

सायबर चोरट्यांकडून सर्वसामान्य व्यक्तीला सहज आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगर शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये पाच ते सहा जणांची मोबाईलवर आलेल्या लिंकमध्ये माहिती भरल्याने फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान अशा फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com