अर्बन बँकेत 350 पेेक्षा जास्त पिशव्यांमध्ये बनावट सोने

पंचनामा सुरू : आज संपूर्ण माहिती येणार समोर
अर्बन बँकेत 350 पेेक्षा जास्त पिशव्यांमध्ये बनावट सोने
संग्रहित फोटो

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) शेवगाव शाखेमधील सोन्यांच्या 350 हून अधिक पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळले आहे. याप्रकरणी या बनावट सोन्याचा पंचनामा सुरू असून आज बुधवारी एकूण किती पिशव्यामध्ये बनावट सोने (fake gold) आहे, हे समोर येणार असल्याचे बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांनी सांगितले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी बँकेत तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याचा लिलाव झाला होता. त्यावेळी पहिल्या पाच पिशव्यांमध्ये सोन्यांऐवजी बेन्टेक्सचे दागिने आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बँकेच्या अधिकार्‍यांनी लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहे. नगर अर्बन बँक अनेक वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेली आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली या बँकेचा कारभार केला जात होता.

कोट्यवधी रुपयांची बोगस कर्ज दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडेही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास चालू आहे. बँकेच्या प्रशासनाला शेवगाव शाखेमध्ये 2018 पासून एकाच व्यक्तीच्या नावावर सोन्याच्या पिशव्या असल्याने शंका उपस्थित करत यासंदर्भात लेखी पत्र बँकेच्या मुख्यालयातील प्रशासनास दिले होते.

त्यानंतर याप्रकरणाची चौकशी होत नसल्याचे बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी व पोपट लोढा यंनी बँकेला पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेवगाव येथील तारण ठेवलेल्या सर्व सोन्याच्या पिशव्यांचा पंचनामा सुरू असून त्यात 350 हून अधिक सोन्याच्या पिशव्यातील सोने बनावट असल्याचे रेखी यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com