फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून महिलेची बदनामी
सार्वमत

फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून महिलेची बदनामी

सायबर पोलिसांची कारवाई

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाने वैयक्तिक रागापोटी एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्या महिलेची बदनामी केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तरुणाला अटक केली आहे. गणेश पांडुरंग गायकवाड (वय-30, रा. सिद्धार्थनगर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेने 13 एप्रिलला या संदर्भात फिर्याद दिली होती.

गायकवाड याने फिर्यादी महिलेचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याद्वारे फिर्यादीच्या भावाच्या मित्राला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. फिर्यादी असल्याचे भासवत त्या मित्रासोबत चॅटिंग केली. फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचे सेल्फी फोटो मित्राला पाठवून फिर्यादी महिलेची बदनामी केली.

फिर्यादीच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा, भादंवि कलम 354, 355, 506 अन्वये गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वैयक्तिक रागापोटी गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण परदेशी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस शिपाई अभिजीत आरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, वासुदेव शेलार यांच्या पथकाने केली.

आरोपी गायकवाड विरोधात जबरी मारहाण, शिवीगाळ, महाराष्ट्र दारूबंदी कायदा, विनयभंग, साथरोग प्रतिबंधक कायदा आदी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात चार व भिंगार कँप पोलीस ठाण्यात एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com