बनावट दस्त करून 0.83 आर शेतजमिनीची खरेदी

बनावट दस्त करून 0.83 आर शेतजमिनीची खरेदी

वडिलोपार्जित शेतजमिनीवर नाव लावण्याच्या बहाण्याने शेतकर्‍याची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वडिलोपार्जित शेत जमिनीवर नाव लावल्याचा बहाणा करत बनावट दस्त तयार करून 0.83 आर जमिनीची खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेले शेतकरी रफिक शहाबुधीन शेख (वय 70 रा. नांगरे गल्ली, आशा टॉकीज चौक, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद अरफत शौकत बागवान (रा. बेलदार गल्ली, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रफिक शहाबुधीन शेख यांची पारगाव मौला (ता. नगर) येथे गट क्र. 46 अ मध्ये वडिलोपार्जित सामायिक 5.40 हेक्टर शेत जमीन असून सदर मिळकतीमध्ये 19 सदस्यांची नावे आहेत. ती जमीन आजपावेतो एकत्रित असून तिचे कोणतेही वाटपपत्र झालेले नाही. शेख यांच्या ओळखीचा मोहम्मद अरफत शौकत बागवान याने त्यांना तुमच्या एकत्रीत जमिनीतला तुमचा हिस्सा तुमच्या नावावर करून देतो, असे म्हणून विश्वासात घेतले. त्यानंतर तो शेख यांना वेळोवेळी भेटून मी तुमचा वडिलोपार्जित हिस्सा नावावर करून देतो, असे सांगत असे. शेख यांनी त्याच्यावर विश्वास दाखविला.

बागवान याने शेख यांना जमिनीचे हिस्सा नावावर करण्याचे सांगून 28 जुलै, 2022 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. कार्यालयामध्ये शेख यांच्या सह्या व अंगठे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे शेख यांनी सह्या व अंगठे दिले होते. त्यानंतर शेख यांनी बागवान याच्याकडे नावावर केलेला कागद (7/12 उतारा) ची वेळो वेळी मागणी केली असता त्याने कोणत्याही प्रकारे कागद दिलेला नाही. त्यामुळे शेख यांनी त्यांचे नातेवाईक अफसर बादशहा शेख (रा. आशा टॉकीज चौक, नगर) यांना घडलेली हकीकत सांगून बागवान हा नाव लागल्याचे कागद देत नाही, असे सांगितले.

अरफत यांनाही बागवान याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर बागवान याने दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी दस्त क्र 4794/22 हा आणून दिला. सदरचा दस्त शेख यांनी नातेवाईक अफसर बादशहा शेख यांना दाखविला. यामध्ये असे लिखित होते की, पारगाव मौला गट क्र. 46 अ येथील 0.83 आर शेत जमीन खरेदी केल्याचे व सदरच्या जमिनीचा मोबादला सात लाख 70 हजार रुपये रोखीने दिले असल्याचे नमुद केलेले होते. सदर खरेदी दस्त तयार करताना साक्षीदार म्हणून शमीन रफिक शेख व समरीन खलील शेख यांची नावे आहेत.

यामुळे मोहम्मद अरफत शौकत बागवान याने 28 जुलै, 2022 रोजी पारगाव मौला येथील गट नं. 46 अ या शेतजमिनीचे वडिलोपार्जित जमिनीवर नाव लावण्याचे ऐवजी खरेदी दस्त क्र. 4794/22 अन्वये मोहम्मद अरफत शौकत बागवान याने कोणत्याही प्रकारची रक्कम न देता त्याचे नावावर खरेदी करून बनावट दस्त तयार करून फसवणूक केली आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com