
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
बनावट कागदपत्र तयार करुन जमीनीची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाथर्डीत आठ दिवसांत तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
दुयय्म निबंधकांच्या फिर्यादीवरुन एक अनोळखी व्यक्ती, हंडाळवाडी येथील आशा महादेव भापकर, सचिन साहेबराव काते (रा. सामनगाव, ता. पाथर्डी), गणेश संजय काळे (जेऊर, ता. पाथर्डी) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सोमनाथ बोरुडे यांची आत्या मथाबाई विठोबा बोरुडे ह्या 1998 साली पैठण येथे मयत झालेल्या आहेत.
मयत मथाबाई बोरुडे यांच्या जागी कुणीतरी बनावट महीला उभी करुन मे 2023 मधे ही जमीन आशा महादेव भापकर यांच्या नावावर खरेदी केलेली आहे. सचिन काते व गणेश काळे त्याला साक्षीदार आहेत. त्यामुळे ही व्यक्ती शोधुन काढण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. बोरुडे यांच्या कुटुंबातीलच एक नातेवाईक व्यक्ती यामधे सहभागी असल्याचे समजते. पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर येतील. येथील दुय्यम निबंधक अनिल रामसिंग जव्हेरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे आहेत असे भासवून फसवणूक केली असल्याची तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे समजते. ह्या महीलेपर्यंत पोलीस गेले की यातील मोठी टोळी उघड होणार आहे. चारही संशयितांवर सह नोंदणी अधिनियम 1908 चे कलम- 82 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर तपास करीत आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात जमीन खरेदी विक्री करणार्या दलालांचा सुळसुळाट झाला असून शेतकर्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन खरेदीखतासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. दुय्यम निबंधक कार्यालयाचे मात्र या प्रकाराकडे सोईस्करपणे दुर्लक्ष होत आहे.
बनवाट दस्तावेज तयार करून जमिनीची परस्पर विक्री कऱणारी टोळी शहरात आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार रेर्कार्डवर दिसत नाही. त्याचे प्यादे रेकॉर्डवर आहेत. त्यांनी त्याचे नाव घेतल्यास खुप मोठी टोळी उघड होईल.त्यांनी शहरातील गरिबांच्या जमिनी परस्पर विक्री केल्याने अनेकजण रस्त्यावर आलेले आहेत.पोलिसांची भूमिका स्पष्ट होईल तेव्हा खरे सत्य जनतेसमोर येईल.