बनावट कागदपत्रे करून जमीन हडपण्याचा प्रयत्न

न्यायालयाच्या आदेशाने कोतवालीत तिघांविरूध्द गुन्हा
बनावट कागदपत्रे करून जमीन हडपण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट आधारकार्ड व रेशनकार्ड तयार करून मयत व्यक्तीच्या नावे असलेली जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तीन व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिशलाबाई नामदेव काटे (वय 50 रा. बुरूडगाव रोड, चौरे मळा अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

लिलाबाई आबा लगड (वय 50 रा. लगडवाडी, शिरसगाव काटा, ता. शिरूर जि. पुणे), पोपट कचरू काटे (वय 50 रा. बुरूडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर), रावसाहेब कचरू काटे (वय 50 रा. ठोंबळी सांगवी ता. आष्टी जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द भादंवि कलम 120(बी), 420, 467, 468, 470, 471, 474 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्रिशलाबाई काटे यांचे पती नामदेव कचरू काटे 3 डिसेंबर 2019 रोजी मयत झाले आहे. त्याचे नावे चाहुराणा खु. येथे सर्व्हे नं. 36 मध्ये प्लॉट नं. 18 चे क्षेत्र 210.94 चौ.मी. पैकी 105.47 चौ. मी. ही मिळकत होती व आहे. सदर मिळकत हडप करण्याच्या दृष्ट हेतुने आरोपींनी संगनमत करून बनावट आधारकार्ड तसेच रेशनकार्ड बनवून मयत नामदेव यांची लिलाबाई आबा लगड ही पत्नी असल्याचे भासवून फिर्यादी यांची फसवणूक केलेली आहे.

यासंदर्भात फिर्यादी 12 डिसेंबर, 2020 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देणेकरिता गेल्या असता तक्रार नोंदविण्यास पोलीस ठाण्यातील संबंधितांनी नकार दिला. फिर्यादी यांनी दिवाणी न्यायालय, अहमदनगर यांच्या आदेशाप्रमाणे प्राप्त केलेले वारस प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सदर बनावट आधारकार्ड व रेशनकार्ड अन्वये आरोपी यांच्याबरोबर संगनमत करून दिवाणी चौकशी अर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखल केला होता. सदर कागदपत्र बनावट असल्याचे तसेच ते केवळ पोपट कचरू काटे व रावसाहेब कचरू काटे यांच्या सांगण्यावरून तयार केल्याचे कबुल केलेले आहे. तसेच ती नामदेव काटे यांची पत्नी नव्हती हे देखील सदर अर्जाच्या उलटतपासामध्ये लिलाबाई हिने मान्य केलेले आहे. अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीच्या नावे असलेली मिळकत लुबाडण्याच्या दृष्ट हेतूने सदर बनावट कागदपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com