अडीच कोटीचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न

अडीच कोटीचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न

स्टेट बँकेच्या 'या' शाखेत घडला प्रकार

अहमदनगर|Ahmedagar

वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांच्या नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करून त्यावर खोट्या सह्या करत ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के यांनी फिर्याद दिली आहे. विपूल नरेश वक्कानी (वय 40), यशवंत दत्तात्रय देसाई (वय 49), नरेश रामचंद्र बालकोंडेकर (वय 33), राहुल ज्ञानोबा गुळवे (वय 46), संदीप भगत, तुषार आत्मराम कुंभारे (सर्व रा. पुणे) व विजेन्द्र दक्ष (रा. दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर, राहुल गुळवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कार, बनावट शिक्के, चेकबुक, मोबाईल असा 20 लाख 95 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिल्ली म्युन्शीपल कौन्शिलच्या नावे अडीच कोटी रूपयांचा एक चेक विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे घेऊन सावेडीतील स्टेट बँकेच्या शाखेत आले. त्यांनी बँकेत चेक वटविण्यासाठी दिला. या चेक बाबत शाखेतील मॅनेजरला शंका आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना संपर्क करून माहिती दिली. निरीक्षक घुगे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी रवी सोनटक्के, संदीप पवार, दिशेन मोरे, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांनी तत्काळ बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांना सदरचा चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

चेक बाबत चौकशी केली असता हा चेक दिल्ली म्युन्शीपल कौन्शिल यांचा नावे स्टेट बँक शाखेतील असल्याचे समजले. याबाबत दिल्ली म्युन्शीपल कौन्शिलकडे पोलिसांनी व बँक मॅनेजर यांनी चौकशी केली असता आम्ही असा कोणताही चेक दिला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यामुळे बनावट चेकचा प्रकार उघडकीस आला. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता हा चेक राहुल गुळवे व संदीप भगत यांनी दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पुणे येथून राहुल गुळवे याला अटक केली. गुळवे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता दिल्ली येथील विजेन्द्र दक्ष याने चेक दिल्याचे समोर आले. यापूर्वी दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न केल्याचे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले. अधिक तपास पोलीस करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com