जनतेला आरोग्य सुविधा न मिळणे हेच राज्य सरकारचे अपयश : आ. मोनिका राजळे

आगसखांड येथे स्व. मुंढे कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन
जनतेला आरोग्य सुविधा न मिळणे हेच राज्य सरकारचे अपयश : आ. मोनिका राजळे
आमदार मोनिका राजळे

कोरडगाव (वार्ताहर) -

राज्यातील जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. औषधांचा काळाबाजार ऑक्सिजनचा तुटवडा असून यामुळे रुग्ण मृत्युमुखी पडत असताना सरकारला राजकारणापलीकडे काही दिसत नाही. विरोधी पक्षाने सरकारवर टीका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टीका करत असल्याची राज्याच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याचा दावा आ. मोनिका राजळे यांनी केला.


तालुक्यातील आगसखांड येथे सभापती सुनीताताई दौंड व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी स्व खर्चातून सुरू केलेल्या 300 बेडच्या स्व. गोपिनाथ मुंढे साहेब कोव्हिड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रातांधिकारी देवदत्त केकाण, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, हभप आदिनाथ महाराज शास्त्री, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, मेजर बालाजी पोंधे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, अमोल गर्जे, खरेदी विक्रीचे संचालक बंडु बोरुडे, वृध्देश्‍वरचे संचालक, बाळासाहेब गोल्हार, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, विष्णूपंत अकोलकर, रंजित बेळगे, नारायणराव काकडे अकोलेचे उपसरपंच अर्जुन धायतडक आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. राजळे यांनी करोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा यांना पूर्ण अपयश आले आहे. यामुळेच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी पेशंटची लूट सुरू आहे. यात लोक मृत्युमुखी पडत असून अवाजवी बिले आकारली जात आहेत.

पाथर्डी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर औषध देण्यासाठी पात्रताधारक वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. करोना लसी मिळत नाही, असे गंभीर प्रकार रोज घडताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील अनेक धर्मदाय संस्थांनी पुढाकार घेऊन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत ते भेटायला तयार नाहीत, पालकमंत्री एक ते दोन महिन्यांतून एकदा येतात या शब्दांत त्यांचा समाचार घेतला. जिल्हा उपाध्यक्ष दौंड यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com