फेल ‘मॉकड्रील’च्या चौकशीचे एसपींचे आदेश

26 ऑगस्ट रोजी आशा टॉकीज चौकात झाले होते ‘मॉकड्रील’
फेल ‘मॉकड्रील’च्या चौकशीचे एसपींचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील आशा टॉकीज चौकात घेण्यात आलेल्या दंगलीच्या ‘मॉकड्रील’मध्ये दंगल नियंत्रण पथकासह बहुतांशी पोलीस ठाण्याची पथके उशिराने घटनास्थळी पोहोचल्याच्या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दाखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकडे यांना दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मॉकड्रील घेण्यात आले होते. कोतवाली पोलिसांकडून आशा टॉकीज चौकात दंगा सुरू झाल्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. माहिती मिळताच अग्निशामक दल व रुग्णवाहिका काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बर्‍याच वेळाने तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. दंगलीचे मॉकड्रील जवळपास संपुष्टात आल्यानंतर भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाण्याची पथके घटनास्थळी दाखल झाली. विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त फौजफाटा, दंगल नियंत्रण पथकही वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने हे मॉकड्रील फेल झाले. या घडलेल्या प्रकारासंदर्भात अधीक्षक मनोज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

एखादी घटना घडल्यानंतर घटनास्थळी बंदोबस्त व इतर पोलीस ठाण्याकडून आवश्यक सहकार्य, मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत एक आदेश यापूर्वीच जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार अनुपालन झाले का, अधिकारी कर्मचारी वेळेवर का पोहोचले नाहीत, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी उपअधीक्षक कातकडे यांना दिले आहेत. पूर्व सूचना न देता शहरात पुन्हा मॉकड्रील घेण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com