कारखाना निवडणूक निकालाने बदलणार श्रीगोंद्याची राजकीय समिकरणे

राहुल जगताप यांनी साधली संधी,नागवडेंसाठी मात्र कसोटी
कारखाना निवडणूक निकालाने बदलणार श्रीगोंद्याची राजकीय समिकरणे

श्रीगोंदा तालुका वार्तापत्र | शिवाजी साळुंके

तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखाना अणि सहकारमहर्षी कुंडलीकराव जगताप पा. (कुकडी) सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी राजकीय संधी साधत कारखाना निवडणूक बिनविरोध करून कुकडीच्या कार्यक्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे. यातून त्यानी आगामी निवडणुकीत सक्षम पर्याय असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.

तर दुसरीकडे राजेंद्र नागवडे यांना सोपी वाटणारी कारखाना निवडणूक त्यांचेच एकेकाळचे सहकारी केशवराव मगर यांनी कसोटीची करून ठेवली आहे. त्यात त्यांना आ. बबनराव पाचपुते यांची मदत मिळत असल्यामुळे नागवडे कुटुंबाला कारखाना निवडणुकीत आपली सत्ता कायम ठेवत पुढील राजकीय परिस्थितीची दिशा ठरविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे. आमदार पाचपुते यांचे मात्र या निवडणुकीत काही झाले तरी पुढच्या राजकिय दृष्टीने बेरजेचे गणित असणार आहे हे मात्र निश्चित. यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीने तालुक्यातील अनेक राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण अनेक वर्षे पाचपुते, नागवडे याच परिवाराच्या भोवती फिरत होते. मात्र माजी आमदार राहुल जगताप यांच्या सक्षम पर्यायानंतर तालुक्यात राजकीय त्रिकोण साधला गेला आहे. दोन्ही सहकारी कारखान्यांवर नागवडे व जगताप यांचेच अनेक वर्ष वर्चस्व राहिलेले आहे. अपवाद वगळला श्रीगोंदा कारखान्यामध्ये एकदा सत्तांतर करत पाचपुतेंच्या ताब्यात कारखाना आला होता. मात्र कारखान्याचा कारभाराबाबत बायस समिती अहवाल आजही चर्चेला येत असतो. त्यावेळी नंतर पुन्हा नागवडेच्या ताब्यात कारखाना कायम राहिला. 2008 च्या निवडणुकीमध्ये देखील पाचपुते गटाचे सात संचालक निवडून आले होते. आता मात्र या निवडणुकीत नागवडेंना त्यांचे सहकारी राहिलेले बापुंच्या बरोबर व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेले केशवराव मगर यांनी आव्हान दिले आहे. मगर यांना पाचपुतें ची साथ असल्याने नागवडेंना सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली आहे.

या सर्व घडामोडीत विरोधकांना थंड करत आपणच किंगमेकर असल्याचे राहुल जगताप यांनी दाखवून दिले आहे. कुकडी कारखाना निवडणूक बिनविरोध करताना जगताप यांच्या विरोधात पाचपुते सक्षम पर्याय देतील अशी यावेळी ही परिस्थिती नव्हती. राहुल जगताप यांनी केलेले प्रयत्न आणि तालुक्यातील बाकी नेत्यांच्या सहकार्याबरोबर विखे यांचे सहकार्यही जगताप यांना बिनविरोधसाठी महत्त्वाचे ठरले अशी चर्चा आहे. आगामी निवडणुकीत आपण सक्षम पर्याय असल्याचा संदेश जगताप यांनी यातून दिला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंच्यासाठी नागवडे मैदानात उतरले होते. याबदल्यात खासदार विखेंनी नागवडे यांना शब्द दिला होता. मात्र राज्यात सत्ता बदल झाला आणि नागवडे पुन्हा काँग्रेसच्या बरोबर आले. आताही विखे यांनी समोर येऊन कुठला संदेश निवडणुकीबाबत दिला नाही. पण अनेक विखे समर्थक हे मगर आणि पाचपुते गटाच्या बरोबर दिसत आहेत. नागवडे यांनी उमेदवार देताना समतोल राहण्यासाठी प्रयत्न केले असले तरी अनेक आजी माजी संचालकांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही आणि या नाराजांवर केशवराव मगर यांची नजर असून त्यांनी आपल्याकडे हे नागवडे समर्थक येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दोन्ही पॅनलचे उमेदवार तोडीस तोड देताना पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते स्वतः उमेदवार आहेत. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ,बाळासाहेब नाहटा ही मंडळी नागवडेंविरोधात उभी ठाकली आहेत. नागवडेंनीही ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.मगर पाचपुते पॅनलमधून बाळासाहेब नाहटा सोसायटी मतदारसंघात निवडणुकीत अधिकृत उमेदवार असले तरी केशवराव मगर यांच्या घरातील योगेश मगर यांचा याच मतदार संघात डमी अर्ज ठेवला असल्याने तो ऐनवेळी सावध पर्याय म्हणून आहे का? अशी ही चर्चा तालुक्यात आहे.

साधारण तेवीस हजार सभासद असणार्‍या नागवडे कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघाले आहे. पाचपुतेंसाठी निवडणुकीत निकाल कसा ही लागला तरी बेरजेचे समीकरण असणारा आहे. या निवडणुकीनंतर होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर देखील या कारखाना निवडणुकीत कुणाला जय मिळतो याची गणितं अवलंबून असणार आहेत. एकंदर निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार असे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com