सुविधा असतांनाही ग्रामीण रुग्णालयात पाळणा थांबेना !

कमी मनुष्यबळात प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र ‘नसबंदी’ जोरात
सुविधा असतांनाही ग्रामीण रुग्णालयात पाळणा थांबेना !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा हा विस्ताराने आणि आकाराने मोठा आहे. यामुळे जिल्ह्यात शासकीय आरोग्य सेवेचे जाळले ही तेवढेच मोठे आहे. जिल्ह्यात 1 जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये आणि 23 ग्रामीण रुग्णालये आहेत. याठिकाणी सर्वसोयी सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, मुबलक आरोग्य कर्मचारी आणि अद्यावत शस्त्रक्रियाग्रह असतांनाही याठिकाणी कुटूंब कल्याण कार्यक्रमातील मुख्य असणारी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात लिमीटेड साधन सामुग्री आणि मनुष्यबळ असतांनाही कुटूंब नियोजन काम जोमाने सुरू आहे.

नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या मार्फत जनतेला आरोग्य सुविधा देण्यात येते. यात प्रामुख्याने गारोदर मातांची प्रसृती, प्रसृतीनंतर देण्यात येणार्‍या सुविधा, विविध लसीकरण, रुग्णांवर प्राथमिक उपचार, दोनपेक्षा जास्त आपत्य असणारे स्त्री अथवा पुरुषांचे कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया, पाळणा लांबवणार्‍या साधनाचा आणि औषधांचा पुरवठा करणे ही कामे करण्यात येतात. यासाठी दरवर्षी एप्रिल ते पुढील वर्षीच्या मार्चदरम्यानचे उद्दिष्ट जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने निश्चित करण्यात येते. यात प्रामुख्याने वर्ष भरातील नसबंदी शस्त्रक्रिया, महिलोची टाक्यांची शस्त्रक्रिया आणि बिन टाक्याच्या शस्त्रक्रियांचा समावेश असतो.

या शस्त्रक्रियांचे जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून महिनानिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ठ निश्चित करण्यात येवून त्यानूसार काम करण्यात येते. चालू वर्षी जिल्हा परिषदेने सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचे 18 हजार 666 उद्दिष्ठ घेतले होते. तर जिल्हा रुग्णालयाने 6 हजार 53 शस्त्रक्रियांचे उद्दिष्ठ घतले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 98 प्राथमिक आरोग्य आणि 555 उपकेंद्र कार्यात आहेत. यातील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात कमी मनुष्यबळावर मागील महिन्यांपर्यंत 9 हजार 689 कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या असून त्याची टक्केवारी 52 टक्के आहे. तर जिल्हा रुग्णालयाकडे सर्व सुविधा, मनुष्यबळ असतांनाही त्यांच्या अवघ्या 1 हजार 666 शस्त्रक्रिया झालेल्या असून त्याची टक्केवारी अवघी 28 टक्के आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

अशी आहे कामगिरी

जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांच्या नियंत्रणात येणार्‍या उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयापैकी टाकळी ढोकेश्वर (पारनेर), घोडगाव (नेवासा), पारनेर ग्रामीण रुग्णालय यांची शस्त्रक्रियांची टक्केवारी शून्य आहे. तर सर्वाधित शस्त्रक्रियांची टक्केवारी ताहराबाद (राहुरीची) 85 टक्के आहे. उर्वरितमध्ये 12 ठिकाणी शस्त्रक्रियेची टक्केवारी 25 टक्क्यांच्या आत आहे. तर राहाता आणि जामखेडची टक्केवारी ही 50 टक्क्यांच्या पुढे आहे.

झेडपी आरोग्य विभागाची कामगिरी

चासनळी (कोपरगाव), निमगाव खैरी (श्रीरामपूर), चास (नगर), वाळकी (नगर) या प्राथमिक आरोग्य केंद्राची शस्त्रक्रियांची टक्केवारी ही शंभर टक्क्यांच्या पुढे आहे. आठ प्राथमिक आरोग्यांची कामगिरी ही 80 टक्क्यांच्या पुढे असून 11 प्राथमिक आरोग्य केंद्राची कामगिरी ही 70 ते 79 टक्क्यांच्या दरम्यान आहे. जिल्ह्यात 48 प्राथमिक आरोग्य केंंद्राची कामगिरी ही 50 टक्क्यांच्या पुढे आहे. यावरून याठिकाणी सुरू असणार्‍या कामाचा अंदाज येतो.

असे मिळते अनुदान

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात होणार्‍या कुटूंब कल्याणच्या शस्त्रक्रिया या मोफत होत असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी यांना शस्त्रक्रिया केल्यानंतर 250 रुपये, तर दारिद्रय रेषेखाली आणि अनुसूचित जाती - जमातीच्या लाभार्थ्यांना सरकारकडून 600 रुपयांचे अनुदान देण्यात येते.

आरोग्यातील पांढरे हत्ती

जिल्ह्यात 23 ग्रामीण रुग्णालय असून त्याठिकाणी देण्यात येणारी आरोग्य सेवा ही चिंतेची बाब आहे. कोविडचा काळ वगळता याठिकाणी येणार्‍या रुग्णांची संख्या, त्याठिकाणी उपलब्ध डॉक्टर, अन्य स्टाफ, औषधे, वीजेचे, पाण्याचे, टेलीफोनचे बिल, त्याठिकाणी देण्यात आलेली विविध उपकरणे, असणार्‍या मनुष्यबळावर होणार खर्च पाहता ही ग्रामीण रुग्णालये पांढरे हत्ती ठरू पाहत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com